नवी दिल्ली – भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेला येत्या गुरुवारपासून येथे होत असलेल्या पहिल्या टी-20 सामन्याने प्रारंभ होत आहे. गेली दोन वर्षे असलेल्या बायोबबलमधून खेळाडूंची सुटका झाली असली तरीही सार्वजनिक कार्यक्रमांत तसेच गर्दीच्या ठिकाणी जाण्यास खेळाडूंवरील बंदी कायम असून या सर्वांची करोना चाचणीही सातत्याने केली जाणार आहे, त्यामुळे खेळाडूंवरील बंधने याही मालिकेत कायम राहणार आहेत.
या मालिकेपूर्वी झालेल्या आयपीएलनंतर आता सुरू होत असलेल्या बायोबबलच्या बंधनाला काढून टाकले गेले आहे. मात्र, मालिकेपूर्वी तसेच मालिकेदरम्यान खेळाडू, सपोर्ट स्टाफ व संबंधित व्यक्ती व खेळाडूंचे कुटुंबीय यांची करोना चाचणी मात्र सातत्याने केली जाणार आहे. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यावरच त्या खेळाडूला सामना खेळता येणार आहे.
खेळाडूंना सार्वजनिक कार्यक्रमांना जाता येणार नाही. ज्या कार्यक्रमांना गर्दी असेल तर जाण्यास खेळाडूंना बीसीसीआयने मनाई केली आहे. सोमवारी यजमान भारत व दक्षिण आफ्रिकेच्या संघातील सर्व खेळाडूंची करोना चाचणी करण्यात आली. सर्व खेळाडूंच्या करोना चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांनी सरावालाही प्रारंभ केला आहे.