चेन्नई – ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्धच्या मालिकांत सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचा इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय व टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात समावेश होण्याचे संकेत मिळाले आहेत.
ऑस्ट्रेलियात प्रमुख फलंदाजांना अपयश येत असताना पंतने आपली उपयुक्तता अनेकदा सिद्ध केली. त्याने सध्या इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतही सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याच्या फलंदाजीची शैली नैसर्गिकरीत्या आक्रमक असल्यामुळे त्याचा हा फॉर्म मर्यादित षटकांच्या सामन्यातही भारतीय संघासाठी लाभदायक ठरू शकतो, असे निवड समितीचे मत पडल्याचेही सांगण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्याचे यष्टीरक्षणही दर्जेदार होत असल्यामुळे त्याचा संघात समावेश करण्यासाठी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व कर्णधार विराट कोहलीही उत्सुक असल्याचे सांगितले जात आहे. सुमार फलंदाजी व गचाळ यष्टीरक्षणामुळे संघाबाहेर ठेवण्यात आलेल्या पंतला इंग्लंडविरोधात होणाऱ्या एकदिवसीय व टी-20 सामन्यासाठी संघात स्थान मिळणार असल्याचे संकेत खुद्द बीसीसीआयकडून मिळत आहेत.
पंतला ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय व टी-20 मालिकेतून डावलण्यात आले होते. कसोटीही पर्यायी यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र, पंतने निराश न होता मिळालेल्या संधीचे सोने केले व अफलातून कामगिरी करत निवड समितीला मत बदलायला भाग पाडले आहे. आता त्याची निवड होणार का ते येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा