-->
kutimb

#INDvENG : गुलाबी चेंडूवर भारताची लिटमस टेस्ट

आजपासून इंग्लंडविरुद्ध तिसरा कसोटी सामना : सर्वांत मोठ्या मैदानावर रंगणार दिवस-रात्र लढत

अहमदाबाद – ऍडलेडच्या दिवस-रात्र सामन्यातील कटू स्मृतींना मागे टाकून भारतीय संघ आजपासून येथे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात उतरणार आहे. ही कसोटी देखील ऍडलेडप्रमाणे दिवस-रात्र पद्धतीने खेळवली जाणार असली तरीही भारतीय संघ मायदेशात खेळत असल्याने खरे आव्हान इंग्लंडसमोरच राहणार आहे. या सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवर जरी गवत राखले गेले असले तरीही प्रत्यक्ष सामन्यापूर्वी ते पूर्णपणे काढून टाकले जाइल अशीच अपेक्षा आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने गुलाबी चेंडूंने होणाऱ्या या दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी इंग्लंडला फारसा लाभ होणार नाही अशीच खेळपट्टी तयार करण्यास सांगितल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठ्या सरदार पटेल स्टेडियमची नवी कोरी खेळपट्टी निर्णायक ठरणार अशीच चिन्हे दिसत आहेत.

या मैदानावरील भारतीय तसेच परदेशी संघांची कामगिरीही विक्रमाच्या कक्षेत नोंदली गेल्याने या सामन्यातही भारतीय संघ नवा इतिहास रचणार का याची उत्सूकता आहे. विक्रमादीत्य सुनील गावसकर यांच्या 10 हजार कसोटी धावा, महान गोलंदाज कपिलदेव यांची कसोटी मधील 83 धावांत 9 गडी ही सर्वोत्तम कामगिरी आणि न्यूझीलंडचे महान गोलंदाज सर रिचर्ड हॅडलीला मागे टाकणारी कामगिरी असे अनेक ऐतिहासिक क्षण या मैदानाने अनुभवले आहेत.

आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासाचे आणखी एक नवे पान या मैदानावर लिहिले जाणार आहे. जागतिक कसोटी क्रिकेटच्या अंतिम सामन्यातील न्यूझीलंडचा प्रतिस्पर्धी संघ ठरण्याच्या दृष्टीने ही कसोटी महत्त्वाची ठरेल. भारताने सामना जिंकल्यास त्यांच्या अंतिम सामना खेळण्याचा आशा भक्कम होतील.

जवळपास सव्वा लाख प्रेक्षक क्षमतेच्या या मोटेरा स्टेडियमवर निम्म्याच म्हणजे 55 हजार प्रेक्षकांच्या साक्षीने हा सामना खेळवला जाणार आहे. या खेळपट्टीबाबत अनेकांनी आपापली मते व्यक्‍त केली आहेत. रोहित शर्माने ही खेळपट्टी फिरकीला साथ देईल असा अंदाज व्यक्त केला आहे. तर इंग्लंड कर्णधार ज्यो रुटने ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देइल. त्यांचा वेगवान गोलंदाज जेम्स ऍण्डरसन याने देखिल चेंडू चांगला स्विंग होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. हा सामना दुपारी 2.30 वाजता सुरू होणार असल्यामुळे अखेरच्या सत्रात पडणाऱ्या दवाचा परिणाम खेळावर होऊ शकतो.

तिसऱ्या सत्रात दव पडल्यामुळे काही झाले तरी फिरकी गोलंदाजांसमोर चेंडूवर पकड मिळविण्याचे आव्हान राहणार आहे. त्याचवेळी खेळपट्टीवरील गवत कितीही काढून टाकले तरी दवा मुळे तेथे चेंडू नक्कीच स्किड होणार आहे. अशा वेळी उमेश यादव तंदुरुस्त झाला ही भारतासाठी चांगली बातमी आहे. मात्र, त्यामुळे कुलदीप यादवला वगळले जाऊ शकते. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात परतला असून त्याच्या जोडीला उमेश यादव, इशांत शर्मा अशी वेगवान गोलंदाजी असेल. त्यांच्यासमोर इंग्लंडच्या बलाढ्य ज्यो रुट, बेन स्टोक्‍स, जॉन बेअरस्टो यांना रोखण्याचे आव्हानराहणार आहे.

अष्टपैलू हार्दिक पंड्याला अंतिम अकरा खेळाडूंत स्थान मिळेल की नाही याबाबत अजून संभ्रम आहे. दुसरीकडे इंग्लंड संघात मायदेशी परतलेल्या मोईन अलीच्या जागी डॉन बेसचा समावेश होऊ शकेल.
जेम्स ऍण्डरसन, जोफ्रा आर्चर किंवा स्टुअर्ट ब्रॉड, मार्क वूड यांच्यापैकी कोणाला खेळवायचे हा प्रश्‍न त्यांच्या समोर आहे. सातत्याने अपयशी ठरलेल्या रोरी बर्न्सची जागा जॅक क्राऊली घेईल, तर तिसऱ्या क्रमांकवर जॉनी बेअरस्टोला पसंती देण्यात येऊन डॅनियल लॉरेन्सला डचू दिला जाऊ शकतो.

इशांतचा शतकी सामना

भारताचे महान गोलंदाज कपिल देव यांच्यानंतर भारतीय संघाकडून शंभर कसोटी सामने खेळणारा इशांत शर्मा हा दुसरा वेगवान गोलंदाज ठरणार आहे. बुधवारपासून सुरू होत असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इशांत मैदानात पाऊल ठेवेल तेव्हा ही कामगिरी त्याच्या नावावर नोंदली जाणार आहे. इशांतने वयाच्या 18 व्या वर्षी भारताकडून पदार्पण केले होते. त्यावेळी राहुल द्रविड कर्णधार होता. कपिल देव यांनी एक वेगवान गोलंदाज म्हणून भारताकडून सर्वाधिक 131 कसोटी सामने
खेळले आहेत.

उमेश अखेर तंदुरुस्त

तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण झाल्यामुळे वेगवान गोलंदाज उमेश यादवचा भारताच्या 14 खेळाडूंच्या संघात समावेश करण्यात आला आहे. येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी उमेशच्या खेळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरीही त्याला अंतिम संघात स्थान मिळणार का ते प्रत्यक्ष सामन्याच्या दिवशी सकाळीच निश्‍चित होणार आहे. उमेश फिट झाल्यामुळे शार्दूल ठाकूरला विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेसाठी मुंबई संघाकडून खेळण्यासाठी मुक्‍त करण्यात आले आहे. मोटेरा येथे झालेल्या तंदुरुस्ती चाचणीत उमेश उत्तीर्ण झाला आहे, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले. डिसेंबरमध्ये मेलबर्न येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात उमेशच्या पोटरीचा स्नायू दुखावल्याने त्याला उर्वरित मालिकेतून माघार घ्यावी लागली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.