अहमदाबाद – इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने सात विकेटनी विजय मिळवला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली याने नाबाद 73 धावा केल्या. त्याचबरोबर कोहलीने या खेळीत काही विक्रम स्वत:च्या नावावर केले.
इंग्लंडविरुद्धच्या 73 धावांच्या खेळीत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 12 हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो जगातील तिसरा कर्णधार बनला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग व दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथ यांनी अशी कामगिरी केली आहे.
कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पॉन्टिंगच्या नावावर आहे. त्याने कर्णधार म्हणून 15 हजार 440 धावा केल्या तर ग्रॅमी स्मिथने 14 हजार 878 धावा केल्या आहेत. कर्णधार म्हणून सर्वात जलद 12 हजार धावा करण्याचा विक्रम कोहलीच्याच नावावर झाला आहे. त्याने फक्त 226 डावात ही कामगिरी केली. यासाठी पॉन्टिंगला 282 तर स्मिथला 294 डाव खेळावे लागले होते.
टी-20मध्ये विक्रम
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 द्वारे कोहलीने टी-20 क्रिकेटमध्ये 3 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 3 हजारचा टप्पा पार करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.