मुंबई – सूर्यकुमार यादव व इशान किशन यांना इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परत आल्यानंतर इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यासाठी या दोन खेळाडूंचा भारतीय संघात समावेश केला जाणार आहे, असेही बीसीसीआयने संकेत दिले आहेत.
या मालिकेत भारतात येत असलेला इंग्लंडचा संघ चार कसोटी, पाच टी-20 तसेच तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जेव्हा संघाची निवड झाली होती तेव्हा बराच वाद झाला होता. तेव्हा ज्या खेळाडूंना संधी मिळणे अपेक्षित होते पण मिळाली नाही अशांना यावेळी इंग्लंड दौऱ्यात संधी मिळण्याची शक्यता आहे.
आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघातील दोन खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आयपीएल स्पर्धेत या दोन्ही खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. सूर्यकुमारला ऑस्टेलिया दौऱ्यात संधी मिळाली नाही. यावरून बराच वाद झाला होता.
फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. तेव्हा इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना संधी मिळू शकते. श्रेयस अय्यर व संजू सॅमसन यांचे संघातील स्थान जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. या दोन्ही खेळाडूंना मिळालेल्या संधीचे सोने करता न आल्याने आता निवड समितीसमोर सूर्यकुमार व किशन यांचा पर्याय विचाराधिन असल्याचे सांगण्यात येत आहे.