चेन्नई – इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामन्यात सुरुवातीला रोहित शर्माचे दीडशतक आणि त्यानंतर रविचंद्रन अश्विनच्या पाच विकेटच्या बळावर भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे. दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 329 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर भारताने इंग्लंडला 134 धावांवर ऑल आउट केले. आर. अश्विनने महत्त्वाची भूमिका बजावत 5 विकेट घेतल्या.
दरम्यान, आर. अश्विनच्या फिरकीपुढे आज इंग्लंडच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. अश्विनने घेतलेल्या 5 विकेटच्या जोरावर इंग्लंडचा 134 धावांवर गुंडाळला. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये एका इनिंगमध्ये 29व्यांदा 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत.
स्टुअर्ट ब्रॉडला शून्य बाद करत अश्विनने नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 200 डावखुऱ्या फलंदाजांना बाद करणारा अश्विन पहिला गोलंदाज ठरला आहे. अश्विनने त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक दिग्गज डावखुऱ्या फलंदाजांन पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.
अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये डेव्हिड वॉर्नरला 10 वेळा, ऍलिस्टर कूक आणि बेन स्टोक्सला 9 वेळा आणि ऍड कोवेन आणि जेम्स अँडरसनला प्रत्येकी 7 वेळा बाद केले आहे. घरच्या मैदानात अश्विनने 23व्यांदा इनिंगमध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत.