अहमदाबाद –भारतीय संघात माझे स्थान केवळ कसोटी सामन्यांपुरतेच आहे हे मलाही माहीत आहे. पण मला मर्यादित षटकांच्या सामन्यात संघात स्थान मिळत नसल्याने मी निराश नाही उलट सध्या मी खेळाचा आनंद घेत आहे, अशा शब्दात रवीचंद्रन अश्विनने आपल्या भावना व्यक्त केल्या.
क्रिकेटपटू तसेच एक व्यक्ती म्हणून माझ्यात काही बदल घडवण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर मैदानावरील कामगिरीही यशदायी होत आहे त्यामुळे खूप समाधान वाटते. अशीच कामगिरी सातत्याने होत राहावी हाच माझा प्रयत्न राहणार आहे. मी कसोटी क्रिकेटचा आनंद घेत आहे.
गेल्या 15 वर्षांतील ही माझी सर्वोत्तम कामगिरी होत आहे. त्यामुळे मानसिकताही सकारात्मक असून आत्मविश्वासही वाढला आहे. आता याच यशस्वी कामगिरीत चौथ्या कसोटीतही सातत्य राहावे यासाठी क्षमतेपेक्षाही जास्त सरस खेळ करण्याचे ध्येय आहे, असेही अश्विनने सांगितले.
येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत अश्विनने अक्सर पटेलच्या साथीत इंग्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व राखले. त्याने याच सामन्यात 400 कसोटी बळींचा टप्पा गाठला. ही कामगिरी करणारा अश्विन जगातला 17 वा तर, भारताचा चौथा गोलंदाज ठरला.