नॉटिंगहॅम – डेव्हीड मलान व लियाम लिव्हिंगस्टोन यांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने भारताविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या लढतीत 20 षटकांत 7 गडी गमावून 215 धावा उभारल्या.
इंग्लंडने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जोस बचलर व जेसन रॉय यांनी धडाक्यात सुरुवात केली. मात्र, हे दोघेही स्थिरावलेले असताना बाद झाले. वटलरने 18 धावा केल्या. त्याने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली होती, मात्र या मालिकेत तो साफ अपयशी ठरला.
दुसरीकडे रॉयनेही आक्रमक 27 धावांची खेळी केली. एका बाजूने मलान खंबीरपणे फलंदाजी करत होता, तर दुसऱ्या बाजूने फिलीप साल्टनेही निराशा केली. त्यानंतर मात्र, मलानची लिव्हिंगस्टोनसह जोडी जमली व या जोडीने भारताच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. मलानने आपले अर्धशतकही थाटात पूर्ण केले. त्याने केलेल्या वेगवान फलंदाजीमुळेच इंग्लंडला द्वीशतकी धावांची मजल मारता आली.
पहिले दोन्ही सामने गमावलेल्या इंग्लंडला या सामन्यात विजयासह प्रतिष्ठा जपण्याचसाठी विजयाची गरज होती. मलान 77 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत 39 चेंडूत 6 चौकार व 5 षटकारांची बरसात केली. लिव्हिंगस्टोनला मात्र, फलंदाजीची संधी तळातील षटकांत न मिळाल्याने तो अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. त्याने 29 चेंडूत 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 42 धावा केल्या.
लिव्हिगस्टोनला साथ देताना तळात हॅरी ब्रुकने 19 तर ख्रिस जॉर्डनने 11 धावा केल्या. भारताकडून रवी बिष्णोई व हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. आवेश खान, उमरान मलिक यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. या सामन्यात अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला विश्रांती देण्यात आली होती.
संक्षिप्त धावफलक – इंग्लंड – 20 षटकांत 7 बाद 215 धावा. (डेव्हीड मलान 77, लियाम लिव्हिंगस्टोन 42, जेसन रॉय 27, हॅरी ब्रुक 19, जोस बटलर 18, ख्रिस जॉर्डन 11, रवी बिष्णोई 2-30, हर्षल पटेल 2-35, आवेश खान 1-43, उमरान मलिक 1-56).