सॅन्टियागो – भारताच्या महिला हॉकी संघाने येथे सुरु असलेल्या स्पर्धेत चीलीच्या वरिष्ठ संघावर 2-0 अशी मात केली.
यापूर्वीच्या सामन्यांत भारताच्या महिला संघाने त्यांच्या ज्युनिअर संघाचा 3-2 असा पराभव केला होता. तर त्यानंतरच्या परतीच्या लढतीत दोन्ही संघांची 2-2 अशी बरोबरी झाली होती.
रविवारी झालेल्या सामन्यात मात्र, भारतीय संघाने आपला खेळ उंचावताना 2-0 असा विजय मिळवला. या सामन्यात भारताच्या संगीता कुमारीने 48 व्या मिनिटाला पहिला गोल करत संघाला आघाडी प्राप्त करुन दिली.
त्यानंतर दुसरा हाफ सुरु झाल्यावर सुषमा कुमारीने 56 व्या मिनिटाला संघाचा दुसरा गोल नोंदवला व आघाडी आणखी भक्कम केली. त्यानंतर चीलीच्या खेळाडूंना संपूर्ण खेळात भारताचा भक्कम बचाव भेदता आला नाही व सामना 2-0 असा गमवावा लागला.