मुंबई – हिटमॅन रोहित शर्मा तंदुरुस्त असल्याचा अहवाल फिजिओ नितीन पटेल यांच्याकडून मिळाल्याने अखेर त्याचा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
त्याच्या तंदुरुस्तीबाबतचा अहवाल आल्यानंतर निवड समितीने त्याच्याशी चर्चा केली व या दौऱ्यातील केवळ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठीच त्याला संघात स्थान मिळाले आहे. त्याला एकदिवसीय व टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी मात्र, संघात स्थान देण्यात आलेले नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
रोहितला आयपीएल स्पर्धेत दुखापत झाली होती व त्यावेळी संघ निवडीपूर्वी पटेल यांनी रोहित जायबंदी असल्याचा अहवाल दिला होता, त्यामुळेच त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात निवड झालेली नव्हती. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता आणि त्याचवेळी रोहितने आपण तंदुरुस्त असल्याचे सिद्ध कराताना मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात सराव केला तसेच प्ले-ऑफमधील सामन्यांतही खेळला.