#INDvAUS : भारताचा आॅस्ट्रेलियावर ३६ धावांनी विजय

राजकोट : भारताने फलंदाजी,गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यावर सरस कामगिरी करत दुस-या एकदिवसीय सामन्यात आॅस्ट्रेलियाचा ३६ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे, त्यामुळे आता १९ जानेवारीला बेंगळूरूत होणारा सामना निर्णायक असणार आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज लोकेश राहुल आजच्या सामन्याचा मानकरी ठरला.

विजयासाठी ३४१ धावांचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाला ५० षटकांत सर्वबाद ३०४ धावसंख्येपर्यतच मजल मारता आली आणि भारताने आॅस्ट्रेलियाचा या सामन्यात ३६ धावांनी पराभव करत विजय संपादित केला. आॅस्ट्रेलियाकडून फलंदाजीत स्टीव्ह स्मिथने १०२ चेंडूत ९ चौकार व १ षटकारांसह सर्वाधिक ९८ तर मार्नस लबूशेनने ४७ चेंडूत ४ चौकारासह ४६ धावांची खेळी केली पण संघास विजय मिळवून देण्यास ते अपयशी ठरले. कर्णधार अॅरन फिंचने ३३, केन रिचर्डसनने २४ आणि एश्टन एगरने २५ धावा केल्या.

भारताकडून मोहम्मद शमीने १० षटकांत ७७ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले. नवदीप सैनी, रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ तर जसप्रीत बुमराहने १ गडी बाद करत महत्वपूर्ण योगदान दिले. कुलदीप यादवने आजच्या सामन्यात कारकिर्दीतील १०० विकेटचा टप्पा गाठला.

तत्पूर्वी, आॅस्ट्रेलियन कर्णधार अॅरन फिंचने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होते त्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ६ बाद ३४० धावा केल्या. भारताची सुरूवात चांगली झाली. सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवनने पहिल्या विकेटसाठी ८३ चेंडूत ८१ धावा जोडल्या. जम्पाने रोहित ४२(४४) धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर कोहली आणि धवनने दुस-या विकेटसाठी ९२ चेंडूत १०३ धावांची भागिदारी करत संघाची धावसंख्या १८४ पर्यंत नेली. केन रिचर्डसनने धवनला स्टार्ककरवी झेलबाद करत दुसरा धक्का दिला. धवनने ९० चेंडूत १३ चौकार व १ षटकारांसह ९६ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीस आलेला श्रेयस अय्यर केवळ ७ धावांवर बाद झाला. जम्पाने त्याला त्रिफळाचित केलं.

त्यानंतर कोहलीने राहुलसोबत चौथ्या विकेटसाठी ६३ चेंडूत ७८ धावांची भागिदारी केली. एडम जम्पाने स्टार्ककरवी कोहलीला झेलबाद केलं. कोहलीने ७६ चेंडूत ६ चौकारासह ७८ धावा केल्या. त्यानंतर आजच्या सामन्यात संधी दिलेल्या मनीष पांडेला खास कामगिरी करता आली नाही आणि तो २ धावांवर बाद झाला. त्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये राहुलने रविंद्र जडेजासोबत सहाव्या विकेटसाठी ३५ चेंडूत ५८ धावांची भागिदारी करत संघाची धावसंख्या ३३८ पर्यंत नेली. राहुलने ५२ चेंडूत ६ चौकार व ३ षटकारांसह ८० धावांची खेळी केली. मोहम्मद शम्मीने नाबाद १ आणि रवींद्र जडेजाने नाबाद २० धावा करत ५० षटकांत संघाची धावसंख्या ३४० पर्यंत नेली. आॅस्ट्रेलियाकडून एडम जम्पाने सर्वाधिक ३ तर केन रिचर्डसनने २ गडी बाद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.