नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट पूर्वीच्या पातळीवर कायम ठेवले आहेत. रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयाचे उद्योजकांच्या संघटनांनी स्वागत केले आहे.
मात्र आगामी काळात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदरात कपात केली जाईल अशी आशा या संघटनांनी व्यक्त केली आहे. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय अग्रवाल यांनी सांगितले की, आगामी काळात परिस्थिती सुधारल्यानंतर उद्योगांना भांडवलाची गरज लागणार आहे.
त्यामुळे महागाईचा दर जास्त असला तरी रिझर्व्ह बॅंकेने उद्योगांना चालना देण्यासाठी व्याजदरात कपात करावी अशी आमची अपेक्षा आहे.
रिझर्व्ह बॅंकेने लघुउद्योगांना आणि दुसऱ्या लाटेचा परिणाम झालेल्या उद्योगांना भांडवल सुलभता निर्माण केली असल्याबद्दल फिक्की या उद्योजकांच्या संघटनेने समाधान व्यक्त केले. अशाच प्रकारचा दृष्टिकोन आगामी काळात ठेवण्याची गरज असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.