नोंदणीवेळी केवळ आधार कार्डाची गरज असणार
नवी दिल्ली – लघुउद्योग मंत्रालयाने नव्या उद्योगाची नोंदणी सोपी केली आहे. आता केवळ ऑनलाइन आधार क्रमांक आणि स्वतःबद्दलची माहिती दिल्यानंतर नव्या उद्योगाची नोंदणी होणार आहे. यासाठी नोंदणीवेळी कोणतीही कागदपत्रे किंवा प्रमाणपत्र अपलोड करण्याची गरज नाही. या निर्णयाची अंमलबजावणी 1 जुलैपासून सुरू होणार आहे.
उद्योग नोंदणी इतकी सोपी झाली आहे, कारण ही प्रक्रिया प्राप्तिकर आणि जीएसटी यंत्रणेची जोडली गेली आहे. त्यामुळे आता केवळ आधार क्रमांक असला तरी उद्योगाची नोंदणी करता येणार आहे. इतर माहिती उद्योजकाने स्वतः द्यायची आहे. त्यामुळे नोंदणी वेळी कसल्याही कागदपत्रांची गरज नाही किंवा अशी कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही.
आता उद्योगाची नोंदणी नव्या पोर्टलवरून केली जाणार आहे. या पोर्टल संदर्भातील माहिती एक-दोन दिवसांत जारी करण्यात येईल. निर्यात आणि उत्पादन क्षेत्रात लघुउद्योगाचे योगदान जास्त आहे. मात्र, मोठ्या उद्योगाइतक्या सवलती आणि मदत या उद्योगांना मिळत नाहीत. मात्र, आगामी काळात लघुउद्योगावर केंद्र सरकारने बरेच लक्ष केंद्रित करायचे ठरविले आहे. कारण या क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो.
लॉकडाऊनचा परिणाम झालेल्या लघुउद्योगांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने तीन लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. यामुळे लघुउद्योगांना कर्जपुरवठा उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर लघुउद्योगाच्या कर्जाची फेररचना करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिलेली आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लघुउद्योग महत्त्वाची भूमिका पार पडतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
आता उद्योगाऐवजी “उद्यम’ शब्द वापरला जाणार
कुटीर, लघु आणि मध्यम उद्योगासंदर्भात आता उद्योगाऐवजी उद्यम हा शब्द वापरात येणार आहे. कारण एंटरप्राइज या इंग्रजी शब्दाशी उद्यम या शब्दाचे अधिक साधर्म्य आहे, असे लघुउद्योग मंत्रालयाने म्हटले आहे. गेल्या महिन्यात सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार उद्योगाचे स्वरूप, उद्योगातील गुंतवणूक आणि उलाढालीच्या आधारांवर ठरणार आहे.