उद्योजकांचे अर्थव्यवस्थेतील योगदानही महत्त्वाचे 

उद्योजक विविध साधनसामग्रीच्या समन्वयाने समृद्धीची निर्मिती करीत असतात. मात्र त्याच्याबाबत नकारात्मक चित्र निर्माण केले जाते. उद्योजकांच्या रचनात्मक कामगिरीची दखल पंतप्रधानाकडून घेण्यात आल्यामुळे उद्योजकांना काम वाढविण्यास प्रेरणा मिळेल. 
आनंद महिंद्रा, अध्यक्ष, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा समूह 
नवी दिल्ली: देशाच्या एकूण विकासात उद्योजकांचे योगदानही महत्वाचे आहे. त्याकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. सरकारच्या या सकारात्मक भूमिकेबद्दल उद्योजकांनी आणि उद्योजकांच्या संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे. यामुळे सर्वसमावेशक विकासाला आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची शक्‍यता असल्याचे असोचेमचे अध्यक्ष संदीप जजोडिया यांनी सांगितले. ते म्हणाले की, यामुळे उद्योगांना काम करण्यास हुरूप मिळणार आहे. ते म्हणाले की, उद्योगांच्या माध्यमातून गुंतवणूक होते. सरकार आणि उद्योगादरम्यान सुसंवाद राहिल्यास एकूणच औद्योगीकरणास चालना मिळणार आहे. सरकारच्या पुढाकाराला उद्योगाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळणार असल्याचे त्यांनी सांगीतले. 
ते म्हणाले की, उत्तर प्रदेशाबरोबरच अनेक राज्यानी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे देशातील गुंतवणूकदारांबरोबरच परदेशातील गुंतवणूकदारही भारतातील विविध राज्यात गुंतवणूक करण्यासाठी सक्रीय झाले आहेत. मात्र राज्य सरकारने पाठपुरावा करण्याची गरज आहे. त्यामुळे जाहीर केल्याप्रमाणे खरोखरच गुंतवणूक होत आहे का तसेच त्यात कोणते अडथळे येत आहेत याच्याकडे राज्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यानी सांगितले. 
त्यामुळे राज्यात रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. त्याचबरोबर संतुलित विकास होण्यास मदत मिळणार आहे. राज्यांनी आणि केंद्र सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्रात समन्वयाने काम करण्याची गरज आहे. त्यात खासगी क्षेत्र आपला वाटा उचलायला तयार आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि ओरिसा या राज्यात उद्योगासाठी पायाभूत सुविधा चांगल्या विकसित झालेल्या आहेत. इतर राज्यांनी त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. महिंद्रा उद्योग समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनीही सरकारने उद्योगांच्या कामाची दखल घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)