पुणे – पुणे जिल्ह्यातील औद्योगिक उत्पादन वेगाने पूर्वपदावर येत असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर या संस्थेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. लॉक डाऊननंतर औद्योगिक उत्पादन कशा पद्धतीने वाढत आहे, यासाठी या संस्थेने आतापर्यंत 17 अभ्यास अहवाल जाहीर केले आहेत. 17व्या अभ्यास अहवालामध्ये पुणे जिल्ह्यातील 150 उद्योगानी सहभाग नोंदविला.
17व्या अहवालातील माहितीनुसार जुलै महिन्यामध्ये एकूण उत्पादन एकूण क्षमतेच्या 78 टक्क्यावर आले होते. ऑगस्ट महिन्यामध्ये हे अधिक उत्पादन 83 टक्क्यावर आले आहे. जुलै महिन्यामध्ये एकूण क्षमतेच्या 79 टक्के कर्मचारी कामावर आले होते. ऑगस्ट महिन्यामध्ये हे प्रमाण वाढून 86 टक्क्यांवर गेले आहे.
या उद्योगांना उद्योगांची क्षमता लॉकडाउन अगोदर होती इतकी होण्यास किती वेळ लागेल असे विचारण्यात आले. 37 टक्के उद्योगांनी सांगितले की, त्यांची उत्पादन क्षमता करोनापूर्व पातळीवर आली आहे. जुलै महिन्यामध्ये हे प्रमाण 30 टक्के होते. 49 टक्के उद्योगानी सांगितले की, उत्पादन क्षमता करोनापूर्व पातळीवर येण्यास सहा महिने लागतील. जुलै महिन्यामध्ये हे प्रमाण 52 टक्के इतके होते.
14 टक्के उद्योगांनी सांगितले की, त्यांना करोनापूर्व उत्पादन पातळी गाठण्यास सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. जुलै महिन्यामध्ये हे प्रमाण 19 टक्के इतके होते. या अभ्यासालासाठी ज्या उद्योगांना विचारणा करण्यात आली त्यामध्ये 65 टक्के उद्योग मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील, 13 टक्के उद्योग सेवा क्षेत्रातील तर 22 टक्के उद्योग संयुक्त क्षेत्रातील होते. त्यामध्ये कुटीर उद्योगाचा 16 टक्के, लघु उद्योगाचा 21 टक्के, मध्यम उद्योगाचा 30 टक्के तर मोठ्या उद्योगाच 33 टक्के समावेश होता.
या सर्वेक्षणातील माहिती बाबत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी सांगितले की, परिस्थिती वेगाने पूर्वपदावर येत आहे, लसीकरण चालू आहे, त्यामुळे वर्षाच्या अखेरीस सर्व उद्योग पूर्वपदावर येतील असे दिसून येते.
चेंबरचे महासंचालक प्रशांत गीरबाने यांनी सांगितले की, उत्पादन परिस्थिीती जरी पूर्वपदावर येत असले तरी, कच्च्या मालाच्या किमती वाढत आहेत. त्याचबरोबर वाहतुकीचा खर्च वाढत आहे. सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे पुण्यातील उत्पादनावर बराच परिणाम झाला असल्याचे दिसून येते.