चार महिने उलटूनही “अपडेट’ नाही : अभ्यासकही संभ्रमात
पुणे – शहर परिसरातील सर्वाधिक प्रदूषणकारी कंपन्या, शहराच्या विविध भागांमधील हवेची गुणवत्ता, पाण्याची तपासणी, ध्वनी मर्यादा तपासणी अशा विविध नोंदी अद्ययावत करण्यात आलेल्या नाहीत. त्या उपलब्ध नसल्याने शहरातील प्रदूषणाच्या स्थिती नेमकी काय आहे? याबाबत अभ्यासकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
एकीकडे शहरात हवा आणि पाण्याचे प्रदूषण सातत्याने वाढत असल्याचे बोलले जात असताना या प्रदूषणाच्या नोंदी सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळातर्फे विविध प्रदूषणविषयक नोंदी ठेवण्याचे काम सोपवण्यात आले आहे. यासाठी मंडळाच्या संकेतस्थळावर विविध पर्यायांअंर्गत या नोंदी उपलब्ध करून दिल्या जात. यामध्ये सर्वाधिक प्रदूषणकारी कंपन्या, उत्सवकाळातील ध्वनीची मात्रा, विविध भागांमधील हवेच्या गुणवत्तेची सद्यस्थिती तसेच विविध काळात केलेली नदीच्या पाण्याची तपासणी अशी सर्व माहिती सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध केली जात असे. या माहितीच्या माध्यमातून शहराच्या पर्यावरणसंदर्भातील सद्यस्थितीबाबत माहिती मिळण्यासाठी मोठी मदत मिळत असे. मात्र गेले काही महिने मंडळाच्या संकेतस्थळावर कोणत्याही नोंदीची अद्ययावत माहिती उपलब्ध नाही.
याबाबत विचारणा केली असता, “संकेतस्थळाचे काम सुरू असून, लवकरच माहिती उपलब्ध करून दिली जाईल’ असे उत्तर देत चालढकल केली जाते. मात्र, अद्यापही यासंदर्भात कोणतेही काम झाले नाही. एकूणच नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या पर्यावरण या विषयाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
कोणतीही माहिती मिळेना
मंडळातर्फे ऑगस्टमध्ये शहर परिसरातील सर्वाधिक प्रदूषणकारी कंपन्यांची नावे जाहीर करण्यात आली होती. यामध्ये हाय एक्प्लोसिव्ह फॅक्टरी, सेरम इन्स्टिट्यूट, टाटा मोटर्स, महिंद्रा हिन्दॉय यासारख्या अनेक नामवंत आणि बड्या कंपन्यांचा समावेश होता. मात्र, त्यानंतर यासंदर्भातील कोणतीही माहिती समोर आली नाही. तसेच प्रत्येक दिवशी प्रकाशित केला जाणाऱ्या हवा गुणवत्तेचा अहवालही गेल्या सहा महिन्यांपासून प्रकाशित झालेला नाही.