नवी दिल्ली – इंडसइंड बँकेची आर्थिक परिस्थिती मजबूत असल्याचे स्पष्टीकरण गेल्या आठवड्यात रिझर्व बँकेने केल्यानंतर या बँकेच्या शेअरच्या भावात सुधारणा होऊन शेअरचे भाव आता स्थिर झाले होते. मात्र मंगळवारी पुन्हा या बँकेच्या शेअरचा भाव पाच टक्क्यांनी कोसळून 637 रुपये 30 पैसे प्रति शेअर या पातळीवर गेला.
शहरच्या भावात पाच टक्क्याची घट झाल्यामुळे या बँकेचे बाजार मूल्य एकाच दिवसात 2,481 कोटी रुपयांनी कमी होऊन 49,649 कोटी रुपये या पातळीवर गेले. या बँकेच्या डेरीव्हेटिव्ह व्यवहारांमध्ये हिशोबात चूक झाल्याची माहिती गेल्या पंधरवड्यात बाहेर आल्यानंतर या बँकेच्या शेअरच्या भावावर परिणाम झाला होता आता.
या बँकेने पीडब्ल्यूसी या कंपनीकडे हिशोब तपासणी दिली आहे आणि पीडब्ल्यूसी शुक्रवारी आपला अहवाल जाहीर करण्याची शक्यता आहे. अगोदरच्या माहितीनुसार या व्यवहारात 2,100 कोटी रुपयाचे तूट आढळून आली होती आणि त्याचा बँकेच्या एकूण मालमत्तेवर 2.35% इतका परिणाम झाला होता. आता पीडब्ल्यूडी नेमका किती आकडा सांगते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.
यामुळेच गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेऊन या बँकेच्या शेअरची विक्री केली असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. रिझर्व बँकेने चालू तिमाही संपण्यापूर्वी म्हणजे 31 मार्चपूर्वी संबंधित चुकीत सुधारणा करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे बँकेकडे यासाठी कमी वेळ आहे.