भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिले प्रभारी पोलीस अधीक्षक यांना निवेदन
नगर – प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी कीर्तनातून महिलांचा अपमान केला आहे. त्यांच्याविरोधात पीसीपीएनटीडी कायद्यानुसार तत्काळ गुन्हा दाखल करावा अन्यथा अकोले येथे त्यांच्या घरी जाऊन त्यांना काळे फासण्यात येइल तसेच येणाऱ्या अधिवेशनात गोंधळ घालून मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येणार आहे असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी दिला आहे.
इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी तृप्ती देसाई आज नगरमध्ये आल्या होत्या. त्यावेळी देसाई यांना सुप्याजवळ काही वारकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला. नगरमध्ये आल्यानंतर देसाई यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन इंदुरीकर महाराजांविरोधात लेखी तक्रार दिली. त्यांच्याविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
येत्या दोन-तीन दिवसांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही, तर आम्ही त्यांच्या आश्रमात जावू असे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री, अनेक मंत्री, काही राजकारणी मंडळी इंदुरीकर महाराजांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी हे बंद करावे, अन्यथा त्यांनाही मंत्रालयात कोंडून घेऊन अद्दल घडवू, असे त्या म्हणाल्या.
इंदुरीकर महाराज महिलांबद्दल जे काही बोलत आहेत, त्याचे पुरावे आम्ही पोलिसांना दिले आहेत, त्यावर कारवाई व्हावी. आम्हाला नगरमध्ये येऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. प्रत्यक्षात कुणीही आडवे आले नाही. अडविणार म्हणणारे कार्यकर्ते विकत घेतले असावेत. त्यांचा काही तरी लाभ होत असावा, त्यामुळे ते आमचा विरोध करीत आहेत.
दिलगीरी व्यक्त करणारे पत्रक काढून उपयोग नाही. सम-विषमचा वाद माघे घेवून महिलांची लेखी माफी मागावी असेही मागणी देसाई यांनी केली. दरम्यान, इंदुरीकर महाराजांना नोटीस पाठवली आहे. कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी योग्य पावलं उचलली जातील. कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे, अशी माहितीही देसाई यांनी यावेळी दिली.