राजकारणात कधीच उतरणार नाही – इंदुरीकर

संगमनेर: मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर दिसलेल्या इंदोरीकर महाराजांच्या विधानसभा निवडणूक लढविण्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. इंदुरीकर हे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात उभे राहणार असल्याची चर्चा सध्या सुरू होती. यावर ते म्हणतात की “आपण समाजसेवेचे व्रत हाती घेतले आहे, राजकारणात कधीच उतरणार नाही” असे वक्तव्य करत त्यांनी भाजप प्रवेश आणि उमेदवारी ही चर्चा निष्फळ असल्याचे स्पष्ट केले आहे.

संगमनेरमध्ये शुक्रवारी मुख्यमंत्री महाजानादेश यात्रेला आले होते. त्यावेळी सभेच्यावेळी अचानक व्यासपीठावर आलेल्या इंदोरीकर महाराजांनी मुख्यमंत्र्यांशी गप्पा मारल्या. त्यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांसह उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यातच मंत्री विखे संगमनेरसाठी थोरातांच्या विरोधात सक्षम उमेदवाराचा शोध घेत असल्याने इंदोरीकर महाराज हे भाजपचे विधानसभेचे संगमनेरचे उमेदवार असतील अशा चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरु होत्या.

दरम्यान यासंधार्भात इंदोरीकर महाराजाने स्पष्टीकारण दिले आहे. “आज संगमनेर तालुक्यातील महाजनादेश यात्रेमध्ये मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी गेलो नव्हतो. समाजासाठी माझं काहीतरी देणं लागते, आणि माझ्या व्यस्त कार्यक्रमांच्या दैनंदिन जीवनात मला समाजासाठी जी काही मदत करायची असते ती करता येत नाही. म्हणून आज मुख्यमंत्र्यांना मी स्वतः १ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द करण्यासाठी संगमनेर गेलो होतो. मी कुठल्याही प्रकारचा राजकीय हेतू मनामध्ये ठेवलेला नव्हता. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मी तो एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला व कुठल्याही पक्षाची मफलर गळ्यात न घालता तिथून कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी निघून गेलो. जर मला राजकारणात किंवा निवडणुकीत उतरायचे असते तर मी संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत तिथेच थांबून राहिलो असतो परंतु मी मात्र समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले आहे.”

राजकारणात मी कधीही येणार नाही. संगमनेर तालुक्याचे नेतृत्व देखील खूप सुसंस्कृत आणि विकासात्मक आहे त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक गोष्टी मी स्वतः समाजासाठी करत आलो आहे. माझ्या स्वतःच्या शाळेसाठी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनीच पहिली वर्गणी दिलेली आहे, आणि आज देखील आमदार बाळासाहेब थोरात हे शाळेला नेहमी मदत करत आहे. मी कधीही या गोष्टीचा विसर पडू देणार नाही. मी सर्व माझ्या हितचिंतकांना व श्रोत्यांना सांगू इच्छितो की मी कधीही राजकारणात येणार नाही. समाजकार्याचा वसा मी हाती घेतलेला आहे तो माझ्याकडून निरंतर सुरू राहील. त्यामुळे माझ्या संगमनेर विधानसभा उमेदवारीच्या काही बातम्या सुरू आहेत. त्यांना मी आजच जाग्यावर पूर्णविराम देतो आहे. अशी प्रतिक्रीया इंदुरीकर महाराजांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)