इंदू मिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याची आज पायाभरणी

मुंबई : मुंबईतील दादरच्या इंदू मिल परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याची आज पायाभरणी होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी होणार आहे. परंतु, कार्यक्रमाच्या निमंत्रणावरुन नाराजीचे सूर उमटत असल्याचे दिसत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला फक्त 16 जणांना निमंत्रण देण्यात आले होते. निमंत्रण नसल्याने बाबासाहेबांचे पणतू आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर नाराज असल्याचे म्हटले जात होते. मात्र अखेरच्या क्षणी इंदू मिल आंदोलनाचे प्रणेते आनंदराज आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

आज दुपारी साडेतीन वाजता पायाभरणीचा कार्यक्रम पार पडणार आहे. सुरुवातीला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसून मंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि अधिकारी यांनाच निमंत्रण देण्यात आलं होतं.

आंबेडकरी चळवळीतील कोणालाही आमंत्रित करण्यात आलेले नाही तसेच इतर मंत्र्यांनाही याची माहिती दिली नसल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर होता. परंतु अखेरच्या क्षणी आनंदराज आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आलं. परंतु वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना अद्याप निमंत्रण दिलेले नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.