इंदू मिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचा सोहळा पुढे ढकलला

Madhuvan

मुंबई – दादरच्या इंदू मिल परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याची आज पायाभरणी होणार होती. परंतु, हा सोहळा अचानकपणे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.

महाविकास आघाडीमधील मंत्र्यांमध्ये धुसफूस आणि निमंत्रणावरून नाराजी नाट्यानंतर अखेर कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. सर्व विभागांशी समन्वय साधून या कार्यक्रमाची पुढील तारीख ठरवण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच कार्यक्रम घोषित करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला फक्त 16 जणांना निमंत्रण देण्यात आले होते. परंतु, बाबासाहेबांचे पणतू आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण नसल्याने तीव्र नाराजी उठली होती. मात्र अखेरच्या क्षणी इंदू मिल आंदोलनाचे प्रणेते आनंदराज आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आले होते. तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या पायाभरणीसाठी आंबेडकर समाजातील नेत्याला महाराष्ट्र सरकारने निमंत्रण दिले नाही यावर आमची नाराजी असल्याची उघड भूमिका रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी घेतली. महाराष्ट्र सरकार पायाभरणीवरुन राजकारण करत असल्याचा दावाही त्यांनी केला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.