इंद्रायणीला अनास्थेचा फेस

  • नदीतून वाहतोय पांढरा फेस : “एमपीसीबी’ उगारणार कारवाईचा बडगा

पिंपरी – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देहू आणि आळंदीला जोडणारी… आध्यात्मिक महत्त्व असलेली… हजारो शेतकरी आणि नागरिकांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या इंद्रायणी नदीला आता प्रदुषणाचा फेस आला आहे. श्री क्षेत्र आळंदीजवळ केळगाव येथे इंद्रायणी नदीपात्रातून गेल्या काही दिवसांपासून पांढरा फेस वाहतो आहे. हा फेस कशामुळे येत आहे, हे देखील संबंधितांना माहीत नाही. यामुळे इंद्रायणी चे पात्र आता अनास्थेच्या फेसाने भरले आहे. नदीपात्रात निर्माण झालेला हा फेस कशामुळे होत आहे, याची तपासणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (एमपीसीबी) सुरू झाली आहे. त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा मंडळातर्फे देण्यात आला आहे.

इंद्रायणी नदी ही लोणावळा, देहू, चिखली, मोशी, केळगाव, आळंदी या मार्गाने वाहत जात पुढे भीमा नदीत मिसळते. नदीपात्रामध्ये सध्या दिसत असलेला फेस नदी प्रदुषणाचे गांभीर्य निदर्शनास आणत आहे. नदीपात्रात प्रक्रिया न करता सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे हा प्रश्‍न निर्माण झाल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. इंद्रायणीमध्ये फेस निर्माण झालेल्या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहे. त्यामध्ये उद्योगांमधून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक सांडपाण्याचा समावेश नसल्याचे प्राथमिकदृष्ट्या जाणवत आहे. नक्की कोणत्या कारणामुळे नदीपात्रात हा फेस निर्माण झाला आहे, याचा शोध “एमपीसीबी’ घेत आहे. त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

आळंदीपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या केळगाव येथे नदीपात्रात फेस निर्माण झालेला आहे. हेच पाणी पुढे आळंदीत येत आहे. तसेच, जलपर्णीही वाढली आहे. आळंदी हे तीर्थक्षेत्र असून येथून दरवर्षी पंढरपूरला जाणाऱ्या संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी येत असतात. त्यामुळे तीर्थक्षेत्र आळंदीजवळून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीला एक आगळेवेगळे महत्त्व आहे. मात्र, येथून वाहणाऱ्या इंद्रायणी नदी प्रदुषणाच्या मुद्दयाकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

ठोस कारवाई हवी
पवना आणि इंद्रायणी नदी प्रदूषण हा मुद्दा वारंवार चर्चिला गेला आहे. नदी प्रदुषणाचा मुद्दा गंभीर होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्याबाबत ठोस स्वरूपाची कारवाई होणे अपेक्षित आहे. एकीकडे नदी सुधारच्या कोट्यवधींच्या गप्पा होतात. दुसरीकडे मात्र इंद्रायणीसारखी आध्यात्मिक आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नदीकडे देखील लक्ष दिले जात नाही. पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातून घरगुती सांडपाणी प्रक्रिया न करता थेट सोडण्यात येते. या घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मैलाशुद्धीकरण प्रक्रिया यंत्रणा उभारण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला दिलेले आहे. तसेच, महापालिकेविरूद्ध खटलाही दाखल केलेला आहे.

इंद्रायणी नदीपात्रात पांढरा फेस निर्माण झालेल्या ठिकाणी पाण्याचे नमुने घेतले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पाण्यावर हा फेस येत आहे. इंद्रायणीमध्ये उद्योगातील रसायनयुक्त सांडपाणी सोडले नसल्याचे प्राथमिकदृष्ट्या तरी जाणवत आहे. नक्की कोणत्या कारणाने नदीपात्रात फेस निर्माण झाला आहे, त्याचा आम्ही शोध घेत आहोत. हा विषय आम्ही गांभीर्याने घेतला आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांना विरोधात कारवाई करण्यात येईल.
– नितीन शिंदे, उप-प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.