इंद्रायणी नदीचे जलपूजन करून नदी सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन

पिंपरी  – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणारे इंद्रायणी नदीचे पात्र आता स्वच्छ आणि प्रदूषणविरहित राहणार आहे. सांडपाणी इंद्रायणी नदीपात्रात जाऊ नये, यासाठी महापालिकेमार्फत नदीच्याकडेने ड्रेनेज लाइन टाकण्यात येणार असून इंद्रायणी नदीचे विधिवत जलपूजन करुन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते आज (गुरुवारी) या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच भोसरीतील उड्डाणपुलाखालील सेवा रस्ते अर्बन स्ट्रीटनुसार विकसित करण्यात येणार आहे. या कामाचेही भूमिपूजन आमदार लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महापौर राहुल जाधव, स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे, माजी महापौर नितीन काळजे यांच्यासह यशोदा बोईनवाड, सुवर्णा बुर्दे, योगिता नागरगोजे, ज्येष्ठ नेते दत्तात्रय गायकवाड, बाळासाहेब गव्हाणे, बबनराव बोराटे, माजी उपमहापौर शरद बोराडे, राजेश सस्ते, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, माउली जाधव, भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्व नगरसेवक-नगरसेविका, विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदीपर्यंत इंद्रायणी नदीचा प्रवाह आहे. या भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे नदीचे प्रदूषण होत होते. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेऊन नदी सुधार प्रकल्प राबविण्याचे निश्‍चय केला. त्याबाबत प्रशासनाला निर्देश देऊन प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करुन घेतला. नदीपात्राच्या कडेने ड्रेनेज लाइन टाकण्यात येणार आहे. त्यामुळे रसायनमिश्रित, सांडपाणी नदीपात्रात जाणार नाही. त्यामुळे नदीचे पात्र स्वच्छ आणि सुंदर राहणार आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले, अत्यंत सूक्ष्म अभ्यास करुन नदी सुधार प्रकल्पाचा अहवाल बनविला आहे. नदीपात्राच्या बाजूला ड्रेनेज लाइन टाकण्यात येणार आहे. त्यामुळे रसायनमिश्रीत आणि सांडपाणी नदीपात्रात जाणार नाही. त्यामुळे इंद्रायणी नदी मोकळा श्‍वास घेणार आहे. नदीचे पात्र स्वच्छ, सुंदर राहणार आहे.

भोसरीतील उड्डाणपुलाखाली “अर्बन स्ट्रीट डिझाईन’
भोसरीतील उड्डाणपुलाखालील सेवा रस्ते “अर्बन स्ट्रीट डिझाईन’ नुसार विकसित करण्यात येणार आहेत. या कामाचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे. रस्ते ‘अर्बन स्ट्रीट डिझाईन’ नुसार रस्ते विकसित केल्यामुळे पादचाऱ्यांना पदपथावरुन चालणे सुलभ होणार आहे. सायकल ट्रॅक, पदपथ, नियोजनबद्ध वाहनतळ, शहर, एसटी बस थांबे, फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र नियोजनबद्ध आराखडा केला जाणार आहे. त्यामुळे पुलाखालील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कायमचा सुटणार असल्याचे आमदार महेश लांडगे यावेळी बोलताना म्हणाले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×