नगर – वाळकी (ता. नगर) येथील ओंकार बाबासाहेब भालसिंग याच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी इंद्रजित रमेश कासार यास स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केले आहे.
वाळकी येथे विश्वजित प्रतिष्ठानच्यावतीने शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यावेळी विरोध केल्याचा राग मनात धरुन 17 नोव्हेंबर रोजी विश्वजित कासार व त्याच्या इतर साथीदारांनी ओंकार भालसिंग याला जबर मारहाण केली होती.
त्यात गंभीर जखमी झालेल्या भालसिंग यांचा पुणे येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात कासार व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी कासार फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी हा वाळकी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कटके यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून आरोपीस वाळकीतून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
पोलीस कर्मचारी दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, पो. ना. सुनील चव्हाण, संदीप पवार, शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, मच्छिंद्र बर्डे, प्रकाश वाघ, विजय धनेधर, योगेश सातपुते, संभाजी कोतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयित आरोपी कासार हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध कोतवाली, नगर तालुका, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.