राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सचिव ऍड.गवांदे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले निवेदन
नगर – इंदोरीकर महाराजांनी कीर्तनातून दिलेल्या सम-विषमच्या सल्ल्यामुळे महिला वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सचिव ऍड. रजना गवांदे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे वादग्रस्त वक्तव्य करणारे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महराज यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
निवृत्ती महाराज इंदुरीकर हे आपल्या कीर्तनातून सामाजिक प्रबोधन करत असल्याचा दावा करतात. इंदूरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनातून गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात केली असून पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केले आहे.
इंदोरीकर महाराज यांनी केलेले वादग्रस्त आणि अशास्त्रीय विधान हे पुरोगामी महाराष्ट्रातील तमाम महिला वर्ग आणि समाजाचा अपमान करणारे आहे. एकीकडे महाराष्ट्र राज्य महिलांच्या वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे बदनाम होत आहे, महिलांचे सतत अपमान होत आहेत, त्यातच इंदूरीकर महाराजांची भर पडली आहे, असा आरोप या निवेदनात केला आहे.