जकार्ता – नोव्हेंबर महिन्यात इंडोनेशियामध्ये होणाऱ्या “जी-20′ देशांच्या परिषदेसाठी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्सककी आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन या दोघांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.
“जी-20′ परिषदेसाठी रशियाला वगळण्यात यावे, यासाठी यंदाचे अध्यक्षपद असलेल्या इंडोनेशियावर पाश्चात्य देशांचा प्रामुख्याने अमेरिकेचा विशेष दबाव येत होता. मात्र “जी-20′ संघटनेला निःपक्ष राहणे आवश्यक आहे, अशी भूमिका इंडोनेशियाने घेतल्याने दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांना या परिषदेसाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विदोदो यांनी ही माहिती दिली. रशिया “जी-20′ गटाचा सदस्य आहे. तर युक्रेन या गटाचा सदस्य नाही. त्यामुळे झेलेन्सकी यांना निमंत्रण द्यावे की नाही, याबाबतच्या मतभेदांवर सामोपचाराने तोडगा काढण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
“जी-20′ परिषदेला उपस्थित राहण्याचे पुतीन यांनी फोन वरून मान्य केले आहे. तर झेलेन्सकी यांनीही आपल्याला निमंत्रण मिळाले असल्याचे ट्विटरवरच्या पोस्टमध्ये मान्य केले आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून रशियाला मुत्सदेगिरीच्या माध्यमातून वेगळे पाडण्याचा प्रयत्न पाश्चिमात्य देशांकडून सातत्याने केला जाऊ लागला आहे.