जकार्ता – भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी बुधवारी इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 स्पर्धेत महिला आणि पुरुष एकेरीत विजयी सलामी दिली. या दोघांनीही प्रतिस्पर्धी खेळाडूला पराभूत करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.
जागतिक चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेत्या सेनने सातव्या मानांकित डेन्मार्कच्या हॅन्स-क्रिस्टियन सोलबर्ग विटिंगसचा 21-10, 21-18, तर ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने डेन्मार्कच्या लाईन क्रिस्टोफरसनला 18-21, 21-15, 21-15 असे पराभूत केले. सेनचा पुढील सामना डेन्मार्कच्या रासमुस गेमकेशी, तर सिंधूची लढत इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंगशी होणार आहे.
दुसरीकडे भारताच्या आकार्षी कश्यपला यूएसएच्या बेवेन झांगकडून 12-21, 11-21 असा पराभव पत्करावा लागला. तसेच दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करताना समीर वर्माला इंडोनेशियाच्या चिको ऑरा द्वी वार्डोयोने 17-21, 15-21 असे पराभूत केले.
मिश्र दुहेरीतही इशान भटनागर आणि तनिषा क्रॅस्टो यांना चौथ्या मानांकित प्रवीण जॉर्डन आणि इंडोनेशियाच्या मेलाती दाएवा ओक्तावियंती यांच्याकडून 14-21, 21-16, 12-21 असा पराभव पत्करवा लागला.