दिलेर दिल्लीकडून मुंबईचे राजे पराभूत

इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग

पुणे  – इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत चुरशीच्या लढतीत मुंबईचे राजे संघाला दिलेर दिल्लीकडून 45-36 असे पराभूत व्हावे लागले. सुरुवातीला दोन्ही संघांनी सावध खेळ केला. पहिल्या सत्रात दिलेर दिल्ली संघाने सुरुवातीच्या तीन मिनिटाला मुंबईचे राजे संघावर 5-3 अशी आघाडी घेतली. यानंतर दिल्ली संघाकडून सुनील जयपालने जोरदार खेळ करत चढाईत चार गुणांची कमाई करून दिली. त्याच्या या खेळामुळे मुंबईला त्यांनी सर्वबाद करत 12-4 अशी मोठी आघाडी घेतली.

आपला हाच फॉर्म दिल्लीने कायम ठेवत पहिल्या क्वॉर्टर अखेरीस 13-6 अशी निर्णायक आघाडी घेतली.
दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये देखील मुंबईचे राजे संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. दिल्लीच्या संघाने दुसऱ्या क्वॉर्टरच्या सुरुवातीच्या तीन मिनिटाला 21-6 अशी आघाडी घेतली. यानंतर मुंबईचे राजे संघाला या क्वॉर्टरमध्ये अवघे सहा गुण मिळवता आले. त्यामुळे दुसऱ्या क्वॉर्टरअखेरीस दिल्लीच्या संघाने 28-12 अशी आघाडी घेतली.

मुंबईचे राजे संघाने तीन चढाईत सहा गुणांची कमाई करत आघाडी 18-30 अशी कमी केली. मुंबईचे राजे संघाने आपला हा आक्रमक खेळ सुरुच ठेवला. पण दिलेर दिल्ली संघाने काही गुणांची कमाई केली. त्यामुळे तिसऱ्या क्वार्टरअखेरीस दिल्लीच्या संघाने 33-22 अशी आघाडी घेतली.

शेवटच्या क्वॉर्टरमध्ये दिल्लीच्या संघाने जोर लावत मुंबईला तिसऱ्यांदा सर्वबाद करत 45-25 अशी आघाडी घेतली. मुंबईचे राजे संघाने सलग पाच गुणांची कमाई करत दिल्लीला पहिल्यादा सर्वबाद केले. असे असले तरीही मुंबई संघाला आघाडी घेण्यात यश मिळाले नाही. अखेर सामना 45-36 असा नऊ गुणांनी गमवावा लागला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.