न्यूयॉर्क: अमेरिकेत चर्चच्या बाहेर कॅरोल सिंगिंग पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरावर गोळी झाडत जखमी केले असून ताब्यात घेतले आहे.
सुदैवाने गोळीबारात कोणीही जखमी झाले नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. न्यूयॉर्क पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितल्यानुसार, हल्लेखोराने गोळीबार सुरु केल्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. एका वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
हल्लेखोर गंभीर जखमी झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मॅनहट्टम येथे हजारो लोक कॉन्सर्टसाठी जमले होते. कॉन्सर्ट संपल्यानंतर लोक तेथून निघत असतानाच हल्लेखोराने गोळीबार सुरु केला. चर्चेच्या पायऱ्यांवर असतानाच हल्लेखोराने गोळीबार सुरु केल्यानंतर एकच धावपळ झाली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने आठ ते दहा गोळ्या झाडल्या. यावेळी पोलिसांनी त्याच्यावर गोळी झाडत जखमी केले. हल्लेखोर गर्दीवर अंदाधुंदपणे गोळीबार करत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यावेळी तो “Shoot me, kill me” असेही ओरडत होता असे पोलिसांनी सांगितले आहे.