संगमनेर : इंदुरीकरांच्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन करता येणार नाही. मात्र गेल्या वर्षांत त्यांनी केलेल्या प्रबोधनाच्या कामामुळे अनेक चुकीच्या चालीरिती बंद झाल्या, असे उद्गार राज्याचे महसूल मंत्री व कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी येथे काढले.
इंदुरीकरांची शाळा असेल वा ते करत असलेले समाज प्रबोधनाचे काम असेल या चांगल्या बाबी आहेत, असेही थोरात म्हणाले. इंदुरीकरांचं एकीकडे कौतुक करत असताना ज्या विधानावरून वाद सुरू आहे त्या विधानाचं मात्र मी समर्थन करणार नाही, असे थोरात यांनी स्पष्ट केले.
‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’, असं वक्तव्य इंदुरीकरांनी एका कीर्तनात केले होते. त्यावरून वाद निर्माण झाला असून त्यांच्यावर चहुकडून चौफेर टीका होत आहे. इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.
या सगळ्या प्रकरणावर बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलं आहे. माझी आणि त्यांची चांगली ओळख असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. संगमनेरात ते पत्रकारांशी बोलत होते.