अन् राजनारायण यांच्याकडून इंदिराजी पराभूत

– विश्‍वास सरदेशमुख

1977 मध्ये प्रथमच कॉंग्रेस सत्तेबाहेर फेकली गेली. या निवडणुकीतील आणखी एक मोठी बातमी होती, ती म्हणजे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा रायबरेलीतून पराभव. त्यांना 55 हजार 202 मतांनी पराभूत व्हावे लागले. त्यांना भारतीय लोकदलाचे उमेदवार राजनारायण यांनी पराभूत केले. इंदिरा गांधी यांना केवळ 1 लाख 22 हजार 517 मते मिळाली तर राजनारायण यांना 1 लाख 77 हजार 719 मते मिळाली. या मतदारसंघात चार उमेदवार मैदानात होते.

आपल्या जीवनात इंदिरा गांधी या लोकसभा निवडणुकीत केवळ एकदाच पराभूत झाल्या. तो पराभवदेखील आपला बालेकिल्ला रायबरेलीतून. मात्र, पराभव झाल्यानंतर त्यांनी रायबरेलीतून कधीही निवडणूक लढविली नाही. इंदिरा गांधी यांना जगातील शक्‍तिशाली नेत्यांपैकी एक मानले जात होते. त्यांनी जून 1975 मध्ये आणीबाणी लागू केली. आणीबाणीनंतर झालेल्या या निवडणुकीत कॉंग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला. इंदिरा गांधी यांच्याबरोबरच त्यांचे चिरंजीव संजय गांधी यांनाही पराभव स्वीकारावा लागला. निवडणुकीच्या इतिहासातील हे दोन मोठे पराभव मानले जातात.

जनतेची नाराजी दूर करता आली नाही
जर देशातील जनतेच्या भावना जाणून घेतल्या असत्या तर इंदिरा गांधी यांनी 1977 मध्ये निवडणूक घेतल्या नसत्या, असे सांगितले जाते. पण त्यांना त्यांचे खासगी सचिव पीएन धर यांनी गुप्तचर संस्थेचा हवाला देत कॉंग्रेसने निवडणुका घेतल्या तर 340 जागा जिंकेल, असे सांगितले. मात्र निकाल याउलट लागला. आणीबाणीमुळे जनता कॉंग्रेस सरकारवर नाराज होती. विरोधी पक्षांची एकजूट झाली होती. जनता पक्ष बॅनरखाली निवडणुका लढवत होती. जयप्रकाश नारायण यांनी सर्वांना एकत्र केले होते.

जेवण करत असतानाच पराभवाची बातमी कळाली
आर.के. धवन हे इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी एका मुलाखतीत केलेल्या खुलाशानुसार इंदिरा गांधी या रात्री जेवण करत होत्या, तेव्हाच त्यांच्या पराभवाची वार्ता कळाली. त्यांनी स्वत:ला सावरत आपला अधिकाधिक वेळ कुटुंबाला देऊ, असे सांगितले. निवडणुकीतील जय-पराजयापेक्षा देश मजबूत होणे महत्त्वाचे आहे, असे त्या म्हटल्याचे धवन सांगतात. 1977 नंतर सत्तेबाहेर गेलेल्या इंदिराजींनी एका वर्षाच्या आत चिकमंगळूर येथील पोटनिवडणूक जिंकून पुन्हा त्यांनी संसद गाठली.

…अन्‌ पंतप्रधानांना कोर्टात जावे लागले
राजनारायण आणि इंदिरा गांधी यांच्यात एकदाच लढत झाली, असे नाही. 1971 मध्ये याच रायबरेलीतून इंदिरा गांधी यांनी राजनारायण यांना मोठ्या फरकाने पराभूत केले होते. ते संयुक्‍त सोशॅलिस्ट पक्षाच्या तिकिटावर उभे होते. राजनारायण यांना जिंकण्याचा विश्‍वास होता; परंतु ते एक लाखाहून अधिक मतांनी पराभूत झाले. त्यामुळे त्यांनी निवडणुकीत गैरप्रकारचा आरोप करत न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. हा खटला बराच काळ चालला. हे प्रकरण इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण असे ओळखले जात होते. या प्रकरणाचे वैशिष्ट्ये म्हणजे पंतप्रधान इंदिराजी यांना आपली बाजू मांडण्यासाठी पहिल्यांदा कोर्टात यावे लागले. या वेळी न्यायाधीश जगमोहन लाल यांनी आदेश देत सुनावणीसाठी जेव्हा इंदिरा गांधी कोर्टात येतील तेव्हा कोणीही उभे राहणार नाही, असे सांगितले. कारण केवळ न्यायाधीश आल्यानंतरच उभे राहण्याची प्रथा आहे. न्यायाधीश जगमोहन यांनी इंदिरा गांधी यांच्याविरुद्ध निकाल दिला आणि 1971 ची निवडणूक रद्द केली. त्याचबरोबर सहा वर्षांपर्यंत निवडणूक लढवण्यावर बंदी घातली. न्यायालयाच्या या निकालानंतर काही दिवसांतच इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)