पिंपरी-चिंचवड : इंदिरा गांधी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला सुरूवात

दोन टप्प्यांत होणार काम; आठ कोटींचा खर्च

पिंपरी – पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाणपुलाची दुरूस्ती सुरू करण्यात आली आहे. या उड्डाणपुलाची दोन टप्प्यांमध्ये दुरूस्ती करण्यात येणार आहे. उड्डाणपुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट आणि दुरूस्तीसाठी 8 कोटी 27 लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात गोकूळ हॉटेलपासून पिंपरीसाठी जाणाऱ्या मार्गाला जोडणाऱ्या पुलाचे काम सुरू केले आहे. तीन महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील दुरुस्तीच्या कामात अहिल्यादेवी होळकर चौकाकडून पिंपरी बाजारपेठेत जाणाऱ्या उड्डाणपुलाची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

इंदिरा गांधी उड्डाण पूल हा 35 वर्षे जुना झाला आहे. या उड्डाणपुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात आले. त्यामध्ये या उड्डाणपुलावरून जड वाहने गेल्यास अपघात होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली. पर्यायाने, उड्डाणपुलाचे आयुर्मान वाढविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून या पुलाची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामासाठी 24 फेब्रुवारी 2020 रोजी ठेकेदारासोबत करारनामा करण्यात आला. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात 24 मार्च 2020 रोजी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आला.

ऑक्‍टोबर-2020 पर्यंत पुलाच्या दुरुस्तीचे काम होऊ शकले नाही. दरम्यान, आता हे दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात गोकूळ हॉटेलपासून उड्डाणपुलावर जाणाऱ्या मार्गाची दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.

या कामामध्ये रेलींग, जिना दुरुस्ती, दोन पुलाच्या जाइन्टमध्ये बसविण्यात येणारे बेअरिंग, रंगरंगोटी आदी कामांचा समावेश आहे.

पुलाचे आयुर्मान 25 वर्षांनी वाढणार
इंदिरा गांधी उड्डाणपुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील दुरुस्तीच्या कामात अहिल्यादेवी होळकर चौकाकडून पिंपरी बाजारपेठेत जाणाऱ्या उड्डाणपुलाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. उड्डाणपुलाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील दुरुस्तीसाठी एकूण 8 कोटी 27 लाख रुपये खर्च होणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी 15 महिन्यांची मुदत दिलेली आहे. उड्डाणपुलाची दुरूस्ती केल्यानंतर या पुलाचे आयुर्मान 25 वर्षांनी वाढणार आहे. हा पूल पाडून पुन्हा बांधण्याचा निर्णय घेतला असता तर त्यासाठी 100 कोटी रुपये इतका खर्च लागला असता, अशी माहिती बीआरटीएस विभागाचे प्रवक्ते विजय भोजने यांनी दिली.

तीन महिन्यांसाठी वाहतुकीत बदल
उड्डाणपुलाची दुरुस्ती सुरू असल्याने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून पिंपरी पुलाकडे जाणारी वाहतूक अहिल्यादेवी चौकमार्गे वळविण्यात आली आहे. पुलाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होईपर्यंत अहिल्यादेवी चौक ते पिंपरी पुलादरम्यानची वाहतूक दुहेरी मार्गाने सुरू केली आहे. तसेच, पुलाखाली राहणारे नागरिक, व्यावसायिक क्रोमा शोरूममार्गे इच्छित ठिकाणी जाऊ शकतील, अशी व्यवस्था केलेली आहे. 21 तारखेपासून पुढील 90 दिवसांसाठी पिंपरी वाहतूक विभागाने वाहतुकीत हा बदल केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.