आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या दरम्यान अंगावर झेब्रयासारखे पट्टे असणारा आणि मानेवर मात्र रंगीत पट्टे असणाऱ्या प्राण्याच्या अनेक जाहिराती पाहिल्याचे आठवत असेल. स्पोर्टर्सबाईकवरून येणारा हा बोलका घोडा घसरून पडतो आणि तेवढ्यात महेंद्रसिंग धोनी धावत येतो आणि तो अंगणातील ब्लॉक्सचा रंग गेला आहे का ते पाहतो. घोड्याला वाटते तो आपली विचारपूस करायला आला आहे. धोनी म्हणतो, तो रंग ठीक आहे ना ते पाहायला आला आहे. तर या अनिमेटेड घोड्याने अशा इंडिगो पेन्टच्या अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे.
धोनीबरोबरच त्या वैशिष्टयपूर्ण घोड्यामुळे या जाहिराती लोकप्रिय झाल्या. अर्थातच कंपनीच्या उत्पादनांबरोबर ब्रॅंड लोकांच्या मनावर ठसवण्याच्या उद्देशाने या जाहिराती करण्यात आल्या होत्या आणि त्याला बऱ्यापैकी यश आल्याचे दिसत आहे. आता सुक्वॉ कॅपिटलचे पाठबळ असलेल्या इंडिगो पेन्टने प्रारंभिक भागविक्रीद्वारे 1,000 कोटी रुपये उभे करण्याचे ठरवले आहे.
त्यासाठी त्यांनी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (सेबी) प्राथमिक कागदपत्रे सादर केली आहेत. प्रारंभिक भागविक्रीसाठी 300 कोटी रुपयांचे समभाग नव्याने जारी करण्यात येणार असून सुक्वॉ कॅपिटल या खासगी इक्विटी फर्मकडे असणाऱ्या शेअरपैकी 58,40,000 शेअरची विक्री करण्यात येणार आहे.
यातून उभा राहणाऱ्या निधीचा वापर कंपनीच्या तमिळनाडूतील पुडुक्कोट्टाई येथील सध्याच्या उत्पादन प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी तसेच मशिनरी खरेदी व उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. सध्या कंपनीचे तमिळनाडूबरोबरच राजस्थान आणि केरळमध्ये उत्पादन प्रकल्प आहेत.