ऑक्सिजन पुरवठ्यासाठी संयंत्राची निर्मिती
‘सीएसआयआर-एनसीएल’-“बीईएल’चे संशोधन
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर व्हेंटिलेटर्सची मागणी वाढली आहे. मात्र, तुलनेत त्याची उपलब्धता पुरेशी नाही. यावर पुण्यातील “सीएसआयआर-एनसीएल’ आणि “बीईएल’ या संस्थांनी ऑक्सिजनवर्धक संयंत्राची निर्मिती केली आहे. या संयंत्रामुळे रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची उपलब्धता वाढेल व ऑक्सिजन सिलिंडरची मागणीत घट होईल, असा दावा संस्थेतर्फे केला जात आहे.
असे चालते संयंत्र
या संयंत्रांमध्ये पोकळ तंतुंच्या पटलावर (पॉलिमरमेंबरेन) आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढविले जाते. हे संयंत्र हवेमध्ये 0.5 ते 15 लिटर प्रतिमिनिट या प्रवाह दरासह 35-40%ऑक्सिजन वाढवते.
यांना होईल उपयोग
अतिगंभीर रुग्ण, वेळेआधी जन्मलेले बाळ, फुफ्फुसाच्या आजाराचे रुग्ण (सीओपीडी, दमा), सर्पदंशाचे रुग्ण आदींवर उपचार करताना ऑक्सिजनची गरज भासते. अशा वेळी या संयंत्राच्या सहाय्याने कमी खर्चात उपचार करता येतील.
उत्पादन वाढवणार
“सीएसआयआर-एनसीएल’ने संयंत्राच्या उत्पादनासाठी याचे हस्तांतरणदेखील केले. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) ने जेनरिचबरोबर मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी सहमती दर्शवली. “सीएसआयआर’-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या वैज्ञानिकांनी डॉ. उल्हास खरुल यांच्या नेतृत्वाखाली याबाबत संशोधन करण्यात आले आहे.
करोना संकटामुळे युद्धपातळीवर, कमी मनुष्य बळासह दहा युनिट्सची निर्मिती केली. प्रसंगी आणखी
100 युनिट्स तयार करण्याची आणि हॉस्पिटलमध्ये पुरवण्याची बीईएलची योजना आहे. हे युनिट वाहतुकीसाठी सुकर असल्याने दुर्गम ठिकाणी नेणे सोयीस्कर आहे.
– के. राजेंद्र, महाप्रबंधक, बीईएल