आळंदी, दि.1 (वार्ताहर) – नवरात्रोत्सवानिमित्त संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी टाळ मृदंगाच्या गजरात देवूळवाड्यातून पद्मावती देवीच्या भेटीला गेली. पद्मावतीच्या निसर्गरम्य वातावरणात आळंदीकरांना पद्मावती आणि माऊलींच्या पादुकांच्या दर्शनाचा दुहेरी लाभ मिळाला. त्यानंतर परतीच्या मार्गात पालखी भोसले कुटुंबियांच्या घरात विसावली. याठिकाणी पूजा-अर्चा झाल्यानंतर पालखीचा देऊळवाड्याचा प्रवास सुरू झाला.
नवरात्रोस्वाची आज अश्विन शुद्ध पंचमी असल्याने पाचवी माळ होती. या निमित्ताने दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास माऊलींची पालखी आळंदीकर ग्रामस्थांनी खांद्यावर घेत देवूळवाड्यातून बाहेर काढली. महाद्वार, चावडी चौक, पद्मावती रस्ता मार्गे पालखी पद्मावती ओढा ओलांडून पद्मावती देवीच्या मंडपात पोचली. याठिकाणी वारकरी विद्यार्थी, ग्रामस्थांनी भजन केले. भाविकांनी पद्मावती आणि माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास माऊलींची पालखी पद्मावती मंदिरापासून मार्गस्थ होत विश्रांतीवडमार्गे पुन्हा देऊळवाड्याकडे माघारी निघाली. यावेळी वडगाव चौकातील भोसले निवासामध्ये माऊलींच्या पालखीचा सायंकाळचा विसावा झाला. यावेळी भोसले कुटूंबियांकडून भोजन प्रसाद देण्यात आला. त्यानंतर पालखी रात्री मंदिरात पावणे आठला पोचली.