पुणे – लडाख येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचाच भाग म्हणजे कुलगुरू व कुलसचिवांनी नुकतीच लडाख येथे एका संस्थेची भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली आहे. काश्मीरमधील सध्याची परिस्थिती पाहता, तेथे संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी अतिघाई होत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
विद्यापीठात सोमवारी व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. त्यात काश्मीर येथे संशोधन केंद्र सुरू करण्यावरून प्राथमिक चर्चा झाली. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर काही कारणामुळे बैठकीला उपस्थित नव्हते. केंद्र शासनाने कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तेथे विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव राज्य शासनाच्या मान्यतेसाठी देण्यात आला आहे. मात्र, विद्यापीठाकडून काश्मीर-लडाख परिसरात केंद्र उभारण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यात येत आहेत. कुलगुरू डॉ. करमळकर आणि कुलसचिव डॉ. पवार यांनी नुकतीच लडाखला भेट दिली. त्यावेळी लडाख एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेकडे संशोधन केंद्राची कल्पना मांडली असता त्यांनी या कल्पनेचे स्वागत केले आहे.
उपकेंद्र काश्मीर किंवा लडाखमध्ये सुरू करण्यात तांत्रिक अडचणी आहेत. मात्र, संशोधन केंद्र सुरू करता येऊ शकते. त्यासाठी स्थानिक महाविद्यालय, शिक्षण संस्था सोबत असणे आवश्यक आहे. त्यासाठी लडाख एज्युकेशन फाउंडेशनकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता मिळाली असली, तरी शासकीय स्तरावर ते अद्याप अस्तित्त्वात आलेले नाही. लडाख एज्युकेशन फाउंडेशनशी या संदर्भातील बोलणी सुरू केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.