पुणे – करोनामुळे राज्य शासनाला मिळणारा महसूल कमी झाला आहे. उत्पन्नाचे स्रोत थांबले आहेत. या परिस्थितीमुळे पुढील महिन्यात शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी कर्ज काढावे लागेल की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, करोना विरुद्ध लढणारे जे कोविड योद्धे आहेत, ते वगळता इतर विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली. यावेळी वडेट्टीवार म्हणाले की, करोना रुग्णांच्या उपचारासाठी राज्य सरकार निधी कमी पडू देणार नाही. मदत, आरोग्यासह कोविड-19साठी लढा देत असलेले चार विभाग वगळता अन्य सर्व विभागातील खर्चांना राज्य सरकारने कात्री लावली आहे. परंतु, कोविड-19 साठी काम करीत असलेल्या योद्धांच्या पगारात कोणतीही कपात केली जाणार नाही. एक वेळी आयएएस अधिकाऱ्यांच्या पगारात कपात करू. परंतु, परिचारिका आणि डॉक्टरांना मात्र त्याची झळ पोहचू देणार नसल्याची ग्वाही वडेट्टीवार यांनी दिली.
विरोधकांना अजूनही सत्ता गेल्याचा “शॉक’
केंद्राकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. विरोधक विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पीएम केअर फंडाला मदत करा, असे सांगणारे महाराष्ट्रद्रोही आहेत. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे अजूनही सत्ता गेल्याच्या शॉकमधून बाहेर येऊ शकलेले नाहीत, असे सांगत वडेट्टीवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.