अमेरिका-चीन व्यापार सुरळीत होण्याचे संकेत

वॉशिंग्टन- अमेरिका आणि चीन यांच्यात गेले काही दिवस जे व्यापार युद्ध सुरू आहे त्यात आता तोडगा निघण्याची शक्‍यता दिसू लागली आहे. खुद्द अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच हे संकेत दिले आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे की पहिल्या टप्प्याच्या व्यापार करारात जवळपास समझोता झाल्यात जमा आहे.

ट्रम्प यांच्या या वक्तव्याचे अमेरिकेच्या शेअर बाजारातहीं विधायक पडसाद उमटले असून तेथील शेअर बाजाराचा निर्देशांकही वधारला आहे. चीनचे उपाध्यक्ष लिऊ हे हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आले असून आज त्यांनी ट्रम्प यांची व्हाईट हाऊस मध्ये भेट घेतली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी ही माहिती दिली.

अमेरिका आणि चीन यांच्यात तोंडी तडजोड झाली असली तरी प्रत्यक्ष कागदावरील करार अजून बाकी असून तो जाहीर होण्यास अजून तीन ते पाच आठवड्यांचा अवधी लागू शकतो. या वर्षाच्या सुरूवातीलाच अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार समझौता बिघडला होता.

ट्रम्प म्हणाले की आम्ही चीनशी चर्चा करून ज्या विषयावर तोडगा काढला आहे, त्यात इंटेलेक्‍यच्युअल प्रॉपर्टी, वित्त सेवा, शेती विषयक बाबी, कृषी उत्पादने इत्यादी विषयांच्या व्यापाराच्या बाबी निश्‍चीत करण्यात आल्या आहेत. चलन आणि विदेशी चलन या बाबींच्या दोन्ही देशांतील वादाच्या मुद्‌द्‌याचेही निराकरण झाले आहे असे ट्रम्प यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.