नवी दिल्ली – भारताचा युवा ग्रॅंडमास्टर आर. प्रज्ञानंद याला चेसेबल मास्टर्स ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीची पहिली लढत त्याने गमावली होती. मात्र, दुसरी लढत जिंकली होती. मात्र, त्यानंतर निकालासाठी घेण्यात आलेल्या टायब्रेकमध्ये चीनच्या डिंग लिरेनकडून त्याला पराभवाचा सामना करावा लागला व उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
अंतिम फेरीतील पहिल्या लढतीत झालेल्या चार डावांत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या डिंग लिरेनने 2.5-1.5 अशा आघाडीवर विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या लढतीत प्रज्ञानंदने लिरेनवर दडपण आणले व ही लढत 2.5-1.5 अशी जिंकली. त्यामुळे निकाल मिळवण्यासाठी टायब्रेक खेळवण्यात आला. त्यात लिरेनने बाजी मारली.