भारतीय गोलंदाज चमकले, बांगलादेशवर एक डाव आणि १३० धावांनी विजय

 इंदूर : गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर बांगलादेशविरूध्दचा पहिला कसोटी सामना भारताने एक डाव आणि १३० धावांनी जिंकला आहे.

या विजयासह दोन कसोटी क्रिकेट सामन्याच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. बांगलादेशने पहिल्या डावात १५० धावा केल्या होत्या. त्यानंतर मयांक अग्रवालच्या व्दिशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ६ बाद ४९३ धावा करत ३४३ धावांची आघाडी घेतली होती.

त्यानंतर बांगलादेशला दुस-या डावात २१३ धावांवर गुंडाळत भारताने विजय संपादित केला. भारताकडून दुस-या डावात मोहम्मद शमीने ४, रविचंद्रन अश्विनने ३ , उमेश यादवने २ आणि इशांत शर्माने १ गडी बाद केला.

दरम्यान, बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली होती, मात्र बांगलादेश कर्णधाराचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक मा-यासमोर बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या १५० धावांमध्ये कोसळला. भारताकडून गोलंदाजीत पहिल्या डावात मोहम्मद शमीने सर्वाधिक (२७/३) गडी बाद केले. तर उमेश यादवने (४६/२), इशांत शर्माने (२०/२) आणि अश्विनने (४३/२) गडी बाद केले. बांगलादेशकडून पहिल्या डावात मोमिनुल हकने ३७ आणि मुशफिकुरने ४३ धावा केल्या.

बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांवर आटोपल्यानंतर पहिल्या दिवसअखेर भारताने १ बाद ८६ धावापर्यत मजल मारली होती. त्यानंतर दुस-या दिवशी १ बाद ८६ धावसंख्येवरून भारताने डावाला सुरूवात केली. त्यानंतर मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पूजारा यांनी अर्धशतके पूर्ण केली. भारताची धावसंख्या १०५ पोहचली असता पूजारा ५४ धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीस आलेला भारतीय कर्णधार विराट कोहलीही शून्यावर बाद झाला. पण मयांक अग्रवालने रहाणेच्या साथीनं डाव सावरत भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेंन नेलं. अंजिक्य रहाणे ८६ धावांवर बाद झाला, तेव्हा भारताची धावसंख्या ३०९ अशी होती.

बांगलादेशी गोलंदाज मेहदी हसनच्या गोलंदाजीवर १९६ धावांवर खेळत असताना मयांकने खणखणीत षटकार खेचत कारकिर्दीतील दुसर व्दिशतक ठोकले. व्दिशतक झळकवल्यानंतर फटकेबाजीच्या प्रयत्नात मयांक २४३ धावांवर झेलबाद झाला. मयांकने ३३० चेंडूत २४३ धावा केल्या, या खेळीत त्याने २८ चौकार व ८ षटकार ठोकले.

मयांक बाद झाल्यानंतर जाडेजा आणि उमेश यादवने तूफान फटकेबाजी करत भारतीय संघाला आणखी मजबूत स्थितीत पोहचवले. दुस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रविंद्र जडेजा ६० तर उमेश यादव २५ धावांवर खेळत होते. दुस-या दिवसअखेर भारताने ६ बाद ४९३ अशी मजल मारत ३४३ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर भारतीय कर्णधार कोहलीने भारताचा डाव घोषित केला.

तिस-या दिवशी भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावाप्रमाणे प्रभावी व अचूक गोलंदाजी करत बांगलादेशचा दुसरा डाव २१३ धावांवर गुंडाळत डावाने विजय संपादित केला. बांगलादेशकडून दुस-या डावात मुशफिकुर रहीमने सर्वाधिक ६४ तर मेहदी हसनने ३८ आणि लिटन दासने ३५ धावा केल्या.

धावफलक :                                                                                                                   बांगलादेश पहिला डाव १५०/१०                                                                                        भारत पहिला डाव : ६ बाद ४९३ (घोषित)                                                                                बांगलादेश दुसरा डाव : २१३/१०.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.