Women’s Asia Cup 2024 (IND vs NEP, Score Update) : महिला आशिया चषक 2024 चा 10 वा सामना भारत आणि नेपाळ यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारताने नेपाळचा 82 धावांनी पराभव केला आहे. महिला आशिया चषक 2024 मध्ये भारताचा हा सलग तिसरा विजय आहे. यासह टीम इंडिया उपांत्य फेरीसाठी पात्र ठरली आहे. आता त्याचा सामना 26 जुलै रोजी ‘ब’ गटातील अव्वल संघाशी होणार आहे. या पराभवासह नेपाळ अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
डंबुला येथील रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकात 3 गडी गमावून 178 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेपाळला 20 षटकांत नऊ गडी गमावून केवळ 96 धावा करता आल्या. या सामन्यात नेपाळचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर झुंजताना दिसले. या सामन्यात नेपाळकडून सीता राणा मगरने सर्वाधिक धावा केल्या. तिने 18 धावांची खेळी खेळली. याशिवाय समझाना खडकाने 07 धावा, कविताने 06 धावा, कॅप्टन इंदूने 14 धावा, रुबिनाने 15 धावा तर बिंदू रावल हिने नाबाद 17 धावा केल्या. नेपाळ संघाच्या 7 फलंदाजांना दुहेरी आकडाही स्पर्श करता आला नाही.
भारतातर्फे दीप्तीने सर्वाधिक बळी घेतले, जिने 3.3 षटकात केवळ 10 धावा देत 3 बळी घेतले. त्यांच्याशिवाय राधा यादव आणि अरुंधती रेड्डी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. रेणुका सिंगनेही एक विकेट घेत वाहत्या गंगेत हात धुवून घेतले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 178 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. शेफाली वर्मा आणि दयालन हेमलता यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघींमध्ये पहिल्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी झाली. हेमलता 42 चेंडूत 47 धावा करून बाद झाली. त्याचवेळी शेफालीने 26 चेंडूत चालू स्पर्धेतील तिचे दुसरे अर्धशतक झळकावले. 48 चेंडूत 81 धावा करून ती बाद झाली. यादरम्यान तिने 12 चौकार आणि एक षटकार लगावला.
Innings Break!#TeamIndia set a 🎯 of 179 runs
8⃣1⃣ from @TheShafaliVerma 💪
4⃣7⃣ from Dayalan Hemalatha 👌Over to our bowlers 🙌
Scorecard ▶️ https://t.co/PeRykFLdTV#WomensAsiaCup2024 | #ACC | #INDvNEP pic.twitter.com/wSVFwk55AX
— BCCI Women (@BCCIWomen) July 23, 2024
या सामन्यात भारताला तिसरा धक्का सजीवन सजनाच्या रूपाने बसला. तिला कविता जोशीने एलबीडब्ल्यू आऊट केले. तिला फक्त 10 धावा करता आल्या. हेमलता आणि शेफाली बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा रनरेट मंदावला. 16व्या आणि 17व्या षटकात फक्त 12 धावा झाल्या. पण शेवटच्या 3 षटकात भारताने 35 धावा केल्या आणि त्यांचा डाव 178 धावांवर संपुष्टात आला. यादरम्यान जेमिमा आणि रिचा या अनुक्रमे 28 आणि सहा धावा करून नाबाद राहिल्या.
दुसरीकडे नेपाळकडून सीता राणा मगरने सर्वाधिक विकेट घेतल्या, तिने 4 षटकात 25 धावा देत 2 बळी घेतले. तर कविता जोशीने एक विकेट घेतली, मात्र तिने यासाठी 4 षटकात 36 धावा दिल्या.
भारत-पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी ठरले पात्र
अ गटातून भारत आणि पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. या गटात दोन्ही संघ अनुक्रमे प्रथम व द्वितीय राहिले. भारताने ग्रुप स्टेजमध्ये सलग तीन सामने जिंकले तर पाकिस्तानने केवळ दोनच सामने जिंकले. भारताच्या खात्यात आता सहा गुण आहेत आणि त्यांचा निव्वळ रनरेट +3.615 आहे. त्याच वेळी, पाकिस्तानच्या खात्यात चार गुण आहेत आणि निव्वळ रन रेट +1.102 आहे.