सलग 12 सामने जिंकत ऑस्ट्रेलियाशी केली बरोबरी
ढाका : अफगाणिस्तानचा क्रिकेट संघ रोज नव्या विक्रमांना गवसणी घालताना पहायला मिळत आहे. बांगलादेशविरुद्धच्या टी-20 सामन्यात अफगाणिस्तानने असाच एक विक्रम करत ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या या मॅचमध्ये अफगाणिस्तानचा 25 धावांनी विजय झाला. अफगाणिस्तानचा हा टी-20 मधला लागोपाठ 12 वा विजय आहे. ऑस्ट्रेलियाचंही लागोपाठ 12 टी-20 सामने जिंकण्याचा विक्रम र् केला आहे.
या सामन्यामध्ये अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 6 गडी बाद करत 164 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा 19.5 ओव्हरमध्ये ऑल आऊट झाला. बांगलादेशकडून मेहमदुल्लाने सर्वाधिक 44 रन केले, तर शब्बीर रहमानने 24 आणि अफीफ हुसैनने 16 रनची खेळी केली. अफगाणिस्तानच्या मुजीब उर रहमानने 15 रन देऊन सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर फरीद मलिक, राशिद खान आणि गुलबदीनने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. त्याआधी अफगाणिस्तानची अवस्था 40 रनवर 4 विकेट अशी झाली होती. पण मोहम्मद नबीने 54 बॉलमध्ये नाबाद 84 रनची खेळी करुन अफगाणिस्तानला 154 रनपर्यंत पोहोचवलं. बांगलादेशकडून मोहम्मद सैफुद्दीनने 4 आणि शाकिब अल हसनने 2 विकेट घेतल्या.
बांगलादेश, अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 ट्रॅंग्युलर सीरिज सुरु आहे. दरम्यान, अफगाणिस्तानने 2018 आणि 2019 मध्ये सगळ्या टी-20 मॅच जिंकल्या आहेत. मागच्या 12 मॅचमध्ये अफगाणिस्तानने झिम्बाब्वेला 3 वेळा, बांगलादेशला 4 वेळा, आयर्लंडला 5 वेळा हरवलं आहे. त्याआधी अफगाणिस्तानला वेस्ट इंडिजने 2017 साली हरवलं होतं.