नवी दिल्ली – भारताचा रशियाबरोबर असलेला व्यापार कमालीचा असंतुलित झाला आहे. त्यामुळे रशियाला निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे दोन्ही देशातील व्यापारातील तूट कमी होण्यास मदत होईल असे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी पुन्हा सांगितले.
ते म्हणाले की, एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत भारताने रशियाला केलेली निर्यात केवळ 2.24 अब्ज डॉलर आहे. तर याच कालावधीत भारताने रशियाकडून केलेली आयात तब्बल 27.35 अब्ज डॉलर इतकी आहे. त्यामुळे या कालावधीत व्यापारातील तूट तब्बल 25.11 अब्ज डॉलरवर गेली आहे.
ही तूट भरून काढण्यासाठी भारताला रशियाबरोबर निर्यात वाढवावी लागणार आहे. यासाठी रशियन सरकार बरोबर चर्चा चालू असल्याचे त्यांनी सांगितले. या कालावधीत भारताने रशियाकडून बर्याच प्रमाणात खनिज तेल आयात केले आहे. त्यामुळे रशियाकडून भारताला होत असलेली आयात वाढली असल्याचे समजले जाते.
गेल्या काही महिन्यापासून भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात माफक दरावर खनिज तेलाची आयात करीत आहे. या आयातीला अनेक देशांनी हरकत घेतली असली तरी भारताने रशियाकडून खनिज तेल खरेदी चालू ठेवली आहे. भारताची ऊर्जा सुरक्षितता ध्यानात घेता भारत जेथून स्वस्त तेल मिळेल तेथून तेल खरेदी करण्याचा प्रयत्न करत राहणार असल्याचे भारत सरकारने अनेक वेळा स्पष्ट केले आहे.
रशियाने भारताच्या आयातीवर शुल्क वाढविले नसले तरी इतर काही अडथळे आहेत. ते अडथळे दूर करण्याची गरज आहे असे जयशंकर यांनी रशियाच्या शिष्टमंडळाबरोबर या विषयावर चर्चा करताना सांगितले. दोन्ही देशादरम्यानचा वार्षिक व्यापार सध्या 66 अब्ज डॉलरचा आहे. तो 100 अब्ज डॉलरपर्यंत वाढविण्यात फारशा अडचणी येणार नाहीत असे ते म्हणाले. दळणवळण, बँकिंग आणि आर्थिक देवाण-घेवाणीच्या संदर्भातले अडथळे दूर करण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न सुरू आहेत. लवकरच दोन्ही बाजूंना मान्य असलेला तोडगा निघेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.