भारतातील खेळणी उद्योग फोफावणार

सुरक्षाविषयक मानदंड पृर्ण करण्यासाठी मुदतवाढ

खेळणी अधिक सुरक्षित होणार
लहान मुले वापरणारी खेळणी सुरक्षित असावी यासंदर्भात सध्या देशात उपलब्ध असलेल्या खेळण्यांची पाहणी करण्यात आली असता त्यातील 67 टक्‍के खेळणी असुरक्षित असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर प्लॅस्टिकची 30 टक्‍के खेळणी वापरण्यासाठी अयोग्य असल्याचे आढळून आले. आता त्यात सुधारणा होणार आहे.

नवी दिल्ली – देशातील खेळणी उद्योगाला लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या उद्योगाला सुरक्षाविषयक मानदंड पूर्ण करण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आला आहे. आता देशातील खेळणी उद्योगाने सुरक्षाविषयक मानदंड जानेवारी 2021 पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे.

याअगोदर उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाने यासंदर्भात जारी केलेल्या परिपत्रकात दुरुस्ती करण्यात आली असून 1 जानेवारी 2021 पर्यंत सुरक्षाविषयक मानदंडाची पूर्तता करण्यास सांगण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये खेळणी उद्योगाला सुरक्षाविषयक मानदंडाची पूर्तता करण्यासाठी भांडवल आणि यंत्रसामग्री उभारणीमध्ये अडचणी येत होत्या. ही बाब ध्यानात घेऊन या उद्योगाने मुदतवाढ मागितली होती.

या उद्योगाकडून आलेल्या निवेदनाचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यानंतर मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे विभागाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. देशात बालकांची संख्या प्रचंड असून खेळण्याची मोठी बाजारपेठ आहे.

मात्र, ही खेळणी काही देशातून आयात केली जातात. ही आयात खेळणी दर्जेदार नसतात. त्याचबरोबर यामध्ये रोगही पसरविणारे अनेक घटक असतात. आता केंद्र सरकारने शक्‍यतो खेळण्याची आयात केली जाऊ नये, यासाठी खेळण्याच्या आयातीवरील शुल्क वाढविण्यात आले आहे. त्याचबरोबर देशांतर्गत बाजारपेठेची गरज भागविण्यासाठी देशात खेळणी उद्योगाला चालना दिली आहे.

देशातील सध्या कार्यरत खेळणी उद्योग मोठ्या प्रमाणात अनौपचारिक क्षेत्रात एकवटलेला आहे. यामध्ये 4 हजार उद्योग सक्रिय आहेत. हा उद्योग औपचारिक पद्धतीने कार्यरत व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. 85 टक्‍के खेळणी आयात केली जातात. ही खेळणी चीन आणि इतर देशातून आयात केली जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळण्याच्या बाबतीत देशात आत्मनिर्भर होण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.