#INDVAUS : टी-20, कसोटी आणि एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक जाहीर
मेलबर्न – करोनाचे सावट असतानाही भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार असल्याचे जाहीर केले असले तरीही कसोटी मालिका चारच सामन्यांची असेल, असेही स्पष्ट करत बीसीसीआयने पाचव्या कसोटीला नकार दिला आहे. या मालिकेबरोबरच टी-20 व एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे.
मार्च महिन्यापासून करोनाचा धोका सातत्याने वाढल्याने या मालिकेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. जगभरात अनेक देशांनी हवाई प्रवासावर बंदी घातली होती तसेच लॉकडाऊनदेखील केले होते. ऑस्ट्रेलिया सरकारनेही देशात सहा महिन्यांचे लॉकडाऊन केले असून त्याची मुदत 30 सप्टेंबरला संपुष्टात येत आहे. त्यानंतर 18 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियातच टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होणार होती.
ही स्पर्धा पार पडल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार होता. या मालिकेत 4 ऐवजी आणखी एक कसोटी सामना खेळत 5 सामन्यांचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने बीसीसीआयला दिला होता. त्यावर स्पष्ट नकार देत ही मालिका 4 सामन्यांचीच होईल, असे बीसीसीआयने जाहीर केले.
करोनामुळे आंतरराष्ट्रीय मालिकांबरोबरच देशांतर्गत स्पर्धाही स्थगित कराव्या लागल्याने ऑस्ट्रेलिया मंडळाला प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. त्यातून बाहेर येण्यासाठी भारतीय संघाचा दौरा होणे अत्यंत महत्त्वाचे होते. पहिल्या प्रस्तावानुसार भारतीय संघातील खेळाडू व सपोर्ट स्टाफला ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यावर 14 दिवस विलगीकरण कक्षात राहावे लागणार असे सांगितले जात होते. मात्र, ही अट काढून टाकण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता हे निर्बंध मागे घेण्यात आले असून यापूर्वीच्या मालिकांप्रमाणे ही मालिका खेळवली जाणार आहे.
यापूर्वी झालेल्या मालिकेत भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत करण्याचा विक्रम केला होता. त्यामुळे यंदा भारतीय संघ याच कामगिरीची पुनरावृत्ती करतो का हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रेक्षकांबाबतचा निर्णय परिस्थितीवर..
या मालिकेतील सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना परवानगी द्यायची का नाही याबाबतचा निर्णय तेव्हाच्या परिस्थितीवर अवलंबून असल्याचे ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे. करोनाचा धोका संपुष्टात आला तरीही मैदानांच्या प्रेक्षक क्षमतेच्या 50 टक्केच तिकिटांची विक्री केली जाईल व सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाईल, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.
टी-20 मालिका
11 ऑक्टोबर – ब्रिस्बेन
14 ऑक्टोबर – कॅनबेरा
17 ऑक्टोबर – ऍडलेड
कसोटी मालिका
पहिली कसोटी
3 ते 8 डिसेंबर (ब्रिस्बेन)
दुसरी कसोटी (दिवस-रात्र)
11 ते 15 डिसेंबर (ऍडलेड)
तिसरी कसोटी :
26 ते 30 डिसेंबर
(मेलबर्न-बॉक्सिंग डे)
चौथी कसोटी :
3 ते 7 जानेवारी (सिडनी)
एकदिवसीय मालिका
12 जानेवारी – पर्थ
15 जानेवारी – मेलबर्न
17 जानेवारी – सिडनी