क्रीडारंग : भारतीय टेनिसची ड्रिमगर्ल

-अमित डोंगरे

भारताची अव्वल टेनिसपटू अंकिता रैना सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. दुबईतील हबटूर करंडक स्पर्धेत तिने विजेतेपद मिळवले व दुहेरीच्या गटात यंदा तिसरे विजेतेपद साकार केले. खरेतर टेनिससम्राज्ञी सानिया मिर्झा हिच्या पावलावर पाऊल ठेवत अंकिताने देखील सुरुवातीला राष्ट्रीय व नंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली. सानियाइतकी प्रसिद्धी तिच्या वाट्याला आली नसली तरीही देशाच्या आश्‍वासक खेळाडूंमध्ये तिचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.

यंदाच्या वर्षी सुरुवातीला अंकिताने महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत थायलंडमध्ये झालेल्या फेरीत विजेतेपद मिळवले. तिथे लगेचच संपन्न झालेल्या आणखी एका स्पर्धेतही तिनेच बाजी मारली. यंदाच्या मोसमात दुबईत स्पर्धा झाल्या. मात्र, त्यानंतर मार्चपासून जगभरात करोनाचा धोका निर्माण झाला आणि संपूर्ण क्रीडा क्षेत्र ठप्प झाले. यावेळी आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसेच जपानमध्ये होत असलेली टोकियो ऑलिम्पिकही संकटात आली. ऑलिम्पिक एक वर्ष लांबणीवर टाकले गेल्याने खेळाडूंना पुढील वर्षी तरी वाव मिळणार आहे. मात्र, अंकिता भरात असताना तिला स्पर्धाच होत नसल्याने निराशेचा सामना करावा लागला.

अंकिताने सुरुवातीला हौशी स्तरावर टेनिस खेळायला प्रारंभ केला व हाच खेळ तिला जगभरात प्रसिद्धी देणारा ठरला. एकेकाळी तिला स्पर्धांमधील सहभाग नव्हे तर सराव करण्यासाठी देखील आर्थिक अडचण जाणवत होती. त्यावेळी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री व देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मदतीमुळे अंकिताची कारकीर्द वाचली. जगभरात होत असलेल्या अनेक स्पर्धांमध्ये गुणवत्ता असूनही तिला आर्थिक चणचणीमुळे सहभागी होता येत नव्हते. त्यावेळी तिने मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी मोदींनी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर लगेचच अंकिताला शक्‍तिदूत या योजनेतून 15 लाख रुपयांची मदत दिली गेली. या मदतीमुळे अंकिताला कारकिर्दीच्या प्रारंभीच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होता आले. मोदी यांनी अंकिताला दरवर्षी 25 लाख रुपये मदत देण्याचेही आश्‍वासन दिले असून त्यामुळे तिला येत्या काळात जगभरात होत असलेल्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेता येणार आहे.

यंदाच्या वर्षी फेब्रुवारीत झालेल्या स्पर्धेद्वारे तिने पहिले विजेतेपद साकार केले व तिथेच हबटूर करंडकावर नाव कोरले. “मेहनत खामोशीसे करो, की सफलता शोर मचाए’ हे तिने शब्दशः खरे करून दाखवले. आज अंकिता देशाची स्टार खेळाडू बनली आणि गेल्या काही वर्षांपासून तिच्याकडे होत असलेले दुर्लक्ष दूर झाले. कॅटरीन गोर्गोद्‌जे हिच्यासह अंकिताने या स्पर्धा जिंकल्या व यंदाच्या वर्षात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील दुहेरीच्या विजेतेपदांची हॅट्ट्रिक साकार केली. तिला एका स्पर्धेत विजेतेपदापासून वंचित राहावे लागले अन्यथा एकाच मोसमात दुहेरीची चार विजेतीपदे तिच्या नावावर विक्रमाप्रमाणे कोरली गेली असती. फेब्रुवारीत एकाच महिन्यात ती तीन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळली व त्यात करंडकही जिंकला. आता तिच्यासमोर येत्या काळात होत असलेल्या कित्येक स्पर्धांमध्ये हाच फॉर्म टिकवण्याचे आव्हान आहे.

जोधपूरमध्ये पार पडलेल्या टेनिस स्पर्धेत तिने भारताची नवोदित टेनिसपटून स्नेहल माने हिच्यासह अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांना उपविजेतेपद मिळाले व अशी कामगिरी करणारी ही पहिलीच आशियाई जोडी ठरली. ही स्पर्धा दोन वर्षांपूर्वी पार पडली होती. 2018 साली झालेल्या या स्पर्धेत एशियाडमध्ये पदक मिळवण्याची अविश्‍वसनीय कामगिरी अंकिताच्या नावावर नोंदली गेली. हे भारताचे एशियाडमधील एकमेव पदक ठरले होते.

अंकिता सध्या जास्त स्पर्धा दुहेरीत खेळत असली तरीही भारतात एकेरी व दुहेरीतील ती पहिल्या क्रमांकाची खेळाडू आहे. तिने आजवर आयटीएफ स्पर्धेत 8 विजेतेपदे मिळवली असून 14 दुहेरीची विजेतेपदेही तिच्या नावावर आहेत. दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या 200 खेळाडूंमध्ये तिची वर्णी लागली. अशी कामगिरी करणारी अंकिता भारताची पाचवी टेनिसपटू बनली आहे. सध्या तिचे क्रमवारीतील स्थान 117 आहे.

पुणे कनेक्‍शन …

अंकिताने पुण्यातही टेनिसचे मार्गदर्शन घेतले आहे. पुण्याचे प्रसिद्ध खेळाडू व प्रशिक्षक हेमंत बेंद्रे यांच्याकडे तिने व्यावसायिक टेनिसचे धडे गिरवले आहेत. पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लबच्या टेनिस कोर्टवर अंकिताने आपल्या गुणवत्तेची साक्ष दिली आहे. सध्या ती पुण्याचेच आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक अर्जुन कढे यांच्याकडे मार्गदर्शन घेत आहे.

मूळची गुजरातची असलेली अंकिता ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेतही दिवसेंदिवस भरारी घेत आहे. तिने यंदाच्या वर्षी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यापूर्वीही तिने मानाच्या विम्बल्डन, अमेरिकन व ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेची पात्रता फेरी गाठली होती. सानिया मिर्झानंतर हे यश मिळवणारी अंकिता भारताची दुसरी टेनिसपटू ठरली आहे. फेडरेशन करंडक टेनिस स्पर्धेत दोन वर्षांपूर्वी तिने जागतिक स्तरावरील अव्वल खेळाडू चीनच्या झु लीन व कझाकस्तानच्या युलिया पुतिनसेव्हा यांना पराभूत करत जाणकारांनाही आश्‍चर्याचा धक्‍का दिला होता. या स्पर्धेत तिने 40 सामने खेळताना 23 विजय व 17 पराभव अशी कामगिरी केली आहे.

रॉजर फेडरर, राफेल नदाल, सेरेना विल्यम्स व सानिया मिर्झा हे तिचे आदर्श आहेत. क्‍ले कोर्टपेक्षा ग्रास व हार्ड कोर्टवर सातत्यपूर्ण खेळ करत अंकिताने आपल्यावरील अपेक्षाही आता वाढवल्या आहेत. असेच यश ती यापुढेही मिळवेल व स्वतःला सानिया मिर्झाची वारसदार म्हणूनही सिद्ध करेल असा विश्‍वास वाटतो. या खेळात आपली कारकीर्द घडवण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असलेली अंकिता येत्या काळात देशाची टेनिसमधील पॉवर हाऊस बनलेली दिसावी, हीच अपेक्षा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.