नवी दिल्ली – भारताचा स्टार भालाफेकपटू शिवपाल सिंग गेल्या वर्षी झालेल्या उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्याला चार वर्षे निलंबित करण्यात आले आहे, असे नाडाच्या (राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी समिती) शिस्तपालन समितीने जाहीर केले आहे.
भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्यानंतर भारताचा दुसरा सर्वात यशस्वी भालाफेकपटू ठरलेल्या शिवपाल सिंगची कारकीर्दच आता संकटात सापडली आहे. ( Javelin thrower Shivpal Singh suspended for four years for doping) टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतलेल्या शिवपालला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चाचणीत दोषि सिद्ध झाल्यामुळे हंगामी निलंबीत केले होते. त्याच्या नमुना अ चाचणीत बंदी घातलेल्या पदार्थांचे अंश आढळले होते.
त्याने बंदी घालण्यात आलेले मेथेंडिएनोन हे स्टेरॉइड घेतल्याचे सिद्ध झाले व चाचणीत तो पॉझिटिव्ह आढळला. टोकियो ऑलिम्पिकमधील पात्रता फेरीत शिवपाल 27 व्या स्थानावर राहिला. ऑक्टोबर 2021 ते 10 ऑक्टोबर 2025 सालापर्यंत त्याला आता कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता येणार नसल्याचेही नाडाने सांगितले आहे.