दुबई – भारतीय महिला क्रिकेट संघातील आक्रमक फलंदाज व लेडी सेहवाग असे संबोधले जाणाऱ्या शफाली वर्माने आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या जागतिक टी-20 क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.
श्रीलंकेची फलंदाज चमारी अटापट्टूनेही फलंदाजांच्या यादीत टॉप-10 मध्ये स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीने 754 रेटिंग गुणांसह पहिले स्थान मिळवले होते. मात्र, गेल्या कित्येक महिन्यांत तीने एकही सामना खेळला नसल्याने शफालीचे रेटींगुण वाढले व तीने 726 गुणांसह या स्थानी झेप घेतली. न्यूझीलंडच्या सोफी डेव्हाईनने 370 रेटिंग गुणांसह अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
या क्रमवारीत भारताच्या दीप्ती शर्माने एका स्थानाने प्रगती केली असून ती तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी टॉप-10 मधून बाहेर पडली असून गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडची फिरकी गोलंदाज सोफी एक्लेस्टोनने अव्वल स्थान कायम राखले आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या 10 खेळाडूंमध्ये भारताच्या दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी स्थान मिळवले आहे.