भारताच्या सरिताला कुस्तीत सुवर्णपदक

नवी दिल्ली  -भारताची कुस्तीपटू सरिता मोर हिने थाटात पुनरागमन करत मोंगोलियाच्या शूवदोर बातारजाव हिचे आव्हान परतवून लावले. या विजयासह तिने सलग दुसऱ्यांदा आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. भारताच्या सीमा बिस्ला (50 किलो) आणि पूजा (76 किलो) यांना मात्र, ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले.

अंतिम फेरीची लढत संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना सरिता 1-7 अशी पिछाडीवर होती. मात्र, 59 किलो वजनीगटात पंचांकडे दाद मागण्याचा भारताचा निर्णय फसल्यानंतर बातारजावला चार गुणांची आघाडी मिळाली. त्यातच सरिताने केलेल्या तांत्रिक चुकीमुळे बातारजावला आणखी एक गुण मिळाला. बातारजावने 7-1 अशी आघाडी घेतल्यानंतर सरिताने जोरदार पुनरागमन केले.

बातारजावविरुद्ध चाल रचत सरिताने चार गुणांची कमाई केली. त्यानंतर बातारजावला रिंगणाच्या बाहेर ढकलत सरिताने 7-7 अशी बरोबरी साधली. अवघ्या 20 सेकंदांचा खेळ शिल्लक असताना सरिताने आणखी एक डावपेच आखत गुण वसूल केले. अखेरीस 10-7 अशा फरकाने सामना जिंकत सरिताने या स्पर्धेतील सलग दुसरे सुवर्णपदक प्राप्त केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.