नवी दिल्ली – जागतिक माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकात भारताचे स्थान 11 अंकांनी घसरले आहे. या क्रमवारीमध्ये भारत आता 161 व्या क्रमांकावर पोचला आहे. “वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2023′ ची घोषणा बुधवारी करण्यात आली. त्यामध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे. मात्र या घसरणीबद्दल माध्यम संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जागतिक पातळीवरील प्रसिद्धी माध्यमांवर देखरेख करणाऱ्या “रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स’ने दरवर्षी ही सूची प्रसिद्ध केली जाते. विविध देशांमधील प्रसिद्धी माध्यमांच्या स्वातंत्र्याबद्दलचा अहवाल त्यामध्ये दिला जातो. यासाठी 180 देशांमधील प्रसिद्धी माध्यमांच्या स्वातंत्र्याचा आढावा घेतला जात असतो. गेल्या वर्षी या सूचीमध्ये भारताचे स्थान 150 व्या क्रमांकावर होते. आता ते स्थान 161 व्या क्रमांकावर गेले आहे.
अन्य तीन देशांमधील स्थिती “समस्या प्रधान’ वरून “अतिशय वाईट’ अशा पातळीपय4ंत पोचली आहे. ताजिकीस्थानची क्रमवारी 1 अंकाने घसरून 153 वर, भारताचे स्थान 16 अंकांनी घसरून 161 वर आणि तुर्कीचे स्थान 16 अंकांनी घसरून 160 व्या क्रमांकावर आले आहे.
माहितीचे प्रस्तुतीकरण मुक्तपणे होण्यापासून रोखले जाण्याचा निकष यासाठी विचारात घेतला जातो. माध्यमांचे राज्यकर्त्यांशी निकटचे संबंध असल्यामुळे माहिती लोकांपर्यंत जशी आहे तशी पोचली जाऊ शकत नाही, असे या अहवालात म्हटले आहे. “वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे’च्या निमित्ताने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. इंडियन वुमेन्स प्रेस कॉर्प्स, प्रेस क्लब ऑफ इंडिया आणि प्रेस असोसिएशनने निर्देशांकात देशाच्या घसरणीचा निषेध केला आहे.